esakal | Video : आपल्या अर्थव्यवस्थेवर काय झाले कोरोनाचे दुष्परिणाम, सांगताहेत शैलेंद्र देवळाणकर
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

जगभरात घडणार्‍या मोठ्या घडामोडींचा दैनंदिन जीवन, व्यवहारावरही मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा जगातील ७० देशांत फैलाव झाला. भारतातही ३० रुग्ण आढळले. याचा आर्थिक परिणाम दैनंदिन गोष्टीवर जाणवणारच.

Video : आपल्या अर्थव्यवस्थेवर काय झाले कोरोनाचे दुष्परिणाम, सांगताहेत शैलेंद्र देवळाणकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जगभरात घडणार्‍या मोठ्या घडामोडींचा दैनंदिन जीवन, व्यवहारावरही मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा जगातील ७० देशांत फैलाव झाला. भारतातही ३० रुग्ण आढळले. याचा आर्थिक परिणाम दैनंदिन गोष्टीवर जाणवणारच. कोरोना व्हायरसमुळे जागतिक पुरवठ्याची साखळी विस्कळित झाली. भांडवलवादात आपण जागतिक स्पर्धेपासून अधिक काळ लांब राहू शकत नाही, असे मत आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’ कार्यालयात शुक्रवार (ता.६) ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये त्यांनी हे मत मांडले.

कोरोनाचे आर्थिक परिणाम भीषण 

कोरोनाचे जगावरील आर्थिक परिणाम भीषण आहेत. जगाच्या पुरवठा साखळीत चीनचा हिस्सा मोठा आहे. कच्च्या मालाच्या बाबतीत आशियात चीन अग्रेसर आहे. उदाः अॅपलची जवळपास पन्नास टक्के उत्पादने चीनमध्ये तयार होतात. मायक्रोसॉफ्टची उत्पादनेसुद्धा यात आहेत. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातल्यानंतर अमेरिकेचे सुद्धा धाबे दणाणले आहे.

कोरोना आल्यापासून चीनमधील पन्नास टक्के प्रदूषण कमी झाले. कारण येथील ७० हजार फॅक्टरी बंद पडल्या. येथील कामगार कारखान्यात जाण्यास तयार नाही. चीन स्वतःची कमतरता कधीच दाखवत नाही. त्यांचा स्वतःचा सोशल मीडिया आहे. तेथील कोरोनाच्या बातम्या फिल्टर होऊन आपल्यापर्यंत येतात. त्यामुळे कोरोनाबाबत संशयाचे धुके अजून वाढत आहे. 

...तर महागाई वाढण्याची शक्यता 

भारत-चीन व्यापार १०० अब्ज डॉलर इतका आहे. अँटिबोयोटिक चीनकडून येतात. त्यामुळे आता औषधांच्या किमती वाढल्या आहेत. भारताने तीन ते चार टक्क्यांपर्यंत महागाई नियंत्रणात ठेवली होती. भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू येतात. मात्र ते येणे कमी झाले तर महागाई वाढण्याची शक्यता आहे; कारण भारतीय उत्पादकांची तेवढी क्षमता नाही. 

भारतीय अर्थव्यवस्था होत आहे खुली 

२००९ मध्ये भारताचा जीडीपी नऊ टक्के होता. आता तो कमी झाला आहे. जीडीपीमध्ये निर्यातीचा वाटा मोठा आहे. ‘आरसेप’च्या माध्यमातून १६ देश एकत्र आले. भविष्यात भारत ‘आरसेफ’चा भाग बनल्यानंतर १६ देशांसाठी बाजारपेठ मुक्त होईल. ज्या किमतीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँडमध्ये वस्तू मिळते त्याच किमतीत ती भारतात सुद्धा मिळेल. यामुळे स्थानिक उद्योगांशिवाय, कृषी उत्पादनाला मोठी स्पर्धा निर्माण होईल. भारत जास्त काळ ‘आरसेप’पासून बाहेर राहू शकत नाही.

औरंगाबादेत कोरोनाचा रुग्ण आढळला तर...

डोनाल्ड ट्रम्प भारतात आले; मात्र १० अब्ज डॉलर व्यापाराचा करार झाला नाही. अमेरिकी उत्पादनावर भारताने इम्पोर्ट ड्युटी लावली आहे. उदाः हार्ले डेव्हिडसनच्या गाड्यांवर भारताने १०० टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली. त्यामुळे त्याची किंमत आपोआप दुप्पट झाली. मात्र, जेव्हा भारत आरसेपच्या करारावर सही करेल आणि या कंपनीची उत्पादने भविष्यात देशात आली तर त्याचा फटका स्थानिक वाहन उद्योगांना बसेल. देशात बुलेट ट्रेनमध्ये फॉरेन प्लेयर येत आहेत. या सर्वांमध्ये जागतिक स्पर्धेपासून आपल्याला फार लांब राहता येऊ शकत नाही. 

शेतमजूर बांधकाम क्षेत्रात 

बुलेट ट्रेन आपण जपानपासून विकत घेत नाही, तर जपानचे इंजिनिअर येथे येणार आहेत. बुलेट ट्रेनमधून दहा हजार रोजगार निर्माण होतील. पूर्वी जीडीपीत शेतीचा वाटा ६३ टक्के होता. तो आता १३ टक्क्यांवर आला आहे. शेतीत उत्पन्न नसल्याने शेतीवर अवलंबून असलेले हेच लोक आता शहरात स्थलांतरित होताना दिसतात. ते प्रशिक्षित नसल्याने बांधकाम क्षेत्रात सर्वजण जात आहे. असे जवळपास नऊ कोटी लोक असतील. कारखाने येत असताना त्यांना प्रमाणपत्रे घ्यावे लागतात. एका उद्योगाला जवळपास ३५० लायसन्स काढावे लागतात. हे आता सर्व सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पाच वर्षांत ३२० अब्ज डॉलर एफडीआय भारतात 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ८५ देशांचे दौरे केले. यावर ४४६ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली. मोदी यांच्या विदेशी यात्रांतून पाच वर्षांत ३२० अब्ज डॉलर एफडीआय भारतात आला; मात्र हा एफडीआय सेवा क्षेत्रात जास्त आहे. एनआरआय हे दोन कोटी ३० लाख आहेत. त्यांनी ८० अब्ज डॉलर भारतात पाठविले. याउलट भारतातील लोक बचतीकडे लक्ष देतात ते ४० टक्के सेव्हिंग करतात. त्या तुलनेत अमेरिकेत फार सेव्हिंग केली जात नाही. २०१६-१७ या वर्षात जगात भारतात सर्वाधिक एफडीआय आले होते. 

देवळाणकर म्हणाले... 

 • भारताची तेल साठवणक्षमता १४ दिवस तर चीनची ६० दिवस आहे. 
 • एक डॉलरने बॅरलची किंमत वाढली तर देशाला दहा हजार कोटींचा फटका. 
 • तेलाचा साठा सुरळीत राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच सरकारचे प्रयत्न. 
 • टेक्सासमध्ये जगाला १०० वर्षे पुरेल एवढे साठे, म्हणून मोदी तेथे गेले. 
 • रशिया भारताचा मित्र असला तरी अमेरिकेसोबत शत्रुत्व भारताला परवडणारे नाही. 
 • ३५ लाख भारतीय अमेरिकेत. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची साथ आवश्‍यक. 
 • पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था सध्या तरी शक्य नाही. 
 • यासाठी जीडीपी ११ टक्के लागेल. तो फारतर आठ टक्के होऊ शकतो. 
 • जागतिक व्यापारात भारताचा वाटा अडीच टक्के. 
 • भारतात तरुण लोकसंख्या आहे, त्याचा फायदा नक्कीच होणार. 
 • ‘हुवेई’ ही चिनी कंपनी भारतात ५-जी टेस्टिंग करत आहे. 
 • अमेरिकेच्या दबावामुळे युरोपीय राष्ट्रांत या कंपनीला थारा नाही. 
 • भारत मात्र अमेरिकेच्या दबावात आला नाही, भारतात टेस्टिंग सुरू.
loading image