कोर्ट टुडे १
(((( कायद्याची भाषा ))))
....
मुख्य साक्ष ते उलटतपासणी
कोर्टाच्या कटघऱ्यात रंगणारा ड्रामा
न्यायालयातील कामकाजात आणि खटल्यांच्या सुनावणीदरम्यान साक्षीदाराचा जबाब अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो. भारतीय पुरावा कायद्यानुसार (Indian Evidence Act ) (भारतीय साक्ष अधिनियम) न्यायालयासमोर साक्षीदाराची साक्ष नोंदवताना प्रामुख्याने मुख्य साक्ष (Examination-in-Chief) आणि उलटतपासणी (Cross-Examination) या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांतून जावे लागते.
मुख्य साक्ष (Examination-in-Chief) ः ज्या पक्षाने (वादी किंवा प्रतिवादी/सरकारी वकील) साक्षीदाराला आपल्या बाजूने पुरावा देण्यासाठी न्यायालयात बोलावलेले असते, त्या पक्षाच्या वकिलाने घेतलेली चौकशी म्हणजे ‘मुख्य साक्ष’ होय.
उद्देश ः आपल्या पक्षाचा दावा किंवा आरोप सिद्ध करण्यासाठी साक्षीदाराकडून घटनेशी संबंधित तथ्ये न्यायालयासमोर मांडणे.
स्वरूप ः वकील आपल्या साक्षीदाराला घटनेच्या क्रमानुसार प्रश्न विचारतात. जसे की, घटनेच्या दिवशी काय घडले, साक्षीदाराने काय पाहिले किंवा ऐकले अशा प्रकारच्या प्रश्नांचा सामावेश असतो. मुख्य साक्ष नोंदवताना वकिलाला सूचक प्रश्न (Leading Questions) विचारण्यास मनाई आहे. म्हणजेच, ज्या प्रश्नाच्या उत्तरातच उत्तर दडलेले असेल किंवा ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर अपेक्षित असेल, असे प्रश्न विचारता येत नाहीत.
उलटतपासणी (Cross-Examination) ः मुख्य साक्ष पूर्ण झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या वकिलाला त्या साक्षीदाराची चौकशी करण्याचा अधिकार मिळतो; या प्रक्रियेला ‘उलटतपासणी’ म्हणतात.
उद्देश : साक्षीदाराच्या विधानातील विसंगती, खोटेपणा किंवा चुकीच्या बाबी न्यायालयासमोर आणणे आणि साक्षीदाराच्या विश्वासार्हतेला आव्हान देणे.
स्वरूप : यात विरोधी पक्षाचे वकील अत्यंत चाणाक्षपणे प्रश्न विचारून साक्षीदाराच्या सांगण्यात काही विरोधाभास आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न करतात.
नियम : उलटतपासणीत विरोधी पक्षाच्या वकिलाला सूचक प्रश्न (Leading Questions) विचारण्याची पूर्ण मुभा असते.
थोडक्यात सांगायचे तर : मुख्य साक्ष म्हणजे ‘आपली बाजू मांडणे’ आणि उलटतपासणी म्हणजे ‘विरोधी पक्षाच्या दाव्याची सत्यता परखणे.’
न्यायव्यवस्थेत निष्पक्ष न्यायदानासाठी हे दोन्ही टप्पे अत्यंत आवश्यक आहेत. मुख्य साक्ष आणि उलटतपासणीच्या समन्वयातूनच न्यायालयासमोर सत्याचा शोध घेणे शक्य होते आणि त्या आधारेच न्यायालय योग्य आणि न्याय्य निकाल देऊ शकते.
थोडक्यात फरक
मुख्य साक्ष ः
स्वतःच्या पक्षाचा वकील घेतो
घटनेची बाजू न्यायालयासमोर मांडली जाते
साक्षीदाराला आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी
....
उलटतपासणी :
विरोधी पक्षाचा वकील घेतो
त्या साक्षीची सत्यता/विश्वसनीयता तपासली जाते
विरोधाभास व कमकुवत बाजू शोधण्याचा प्रयत्न
- अनिल जमधडे
९९२२०३४५००