
मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप
औरंगाबाद : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा खून करुन त्याच्या शरिराचे १७ तुकडे करुन बोअरवेलमध्ये टाकणाऱ्या नराधम मित्राला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी जन्मठेपेची शिक्षा शनिवारी (ता. सोळा) ठोठावली. साहिल ऊर्फ गुड्डू अफसर शेख (वय २८, रा. खादगाव ता. पैठण) असे मित्राचा खून करणाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात मयत मुजीम शेख नबी शेख (वय २५, रा. खादगाव ता. पैठण) याचे वडील शेख नबी शेख शब्बीर (वय ४५) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, १० ऑक्टोबर २०१७ रोजी मुजीम घराबाहेर गेला होता. मात्र तो न परतल्याने मुजीमची आई रुक्साना हिने दिलेल्या तक्रारीवरुन पाचोड पोलिस ठाण्यात मिसींगची तक्रार नोंद करण्यात आली होती.
१० ऑक्टोबर २०१७ रोजी मुजीम हा आरोपी साहिल ऊर्फ गुड्डूच्या टपरीवर बसलेला होता अशी माहिती फिर्यादीला मिळाली. त्यामुळे त्यांनी आरोपीवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन भावांना अटक केली. मात्र पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्यांना जामीन दिला. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे २८ मार्च २०१८ रोजी आरोपीच्या घरा जवळील बोअरवेल परिसरात दुर्गंध येत होती. त्यामुळे पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने बोअरवेल खोदून काढला तेंव्हा २० ते २५ फुटाच्या अंतरावर बोअरवेलच्या पाईपमध्ये शरिराचे सडलेले १७ तुकडे मिळाले. त्या सोबत मुजीमचा मोबाइल आणि शर्टही पोलिसांना सापडला. घटनेनंतर मयताच्या आई-वडीलांची डीएनए तपसणी करण्यात आली असता, ते तुकडे फिर्यादीच्या मुलाचेच असल्याचे सिध्द झाले. या प्रकरणात आरोपी साहिल ऊर्फ गुड्डू सह त्याच्या दोन भावांवर भादंवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक महेश आंधळे, जमादार जे. डब्लू. कनसे, उपनिरीक्षक जे. आर. खरड यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतिष मुंडवाडकर यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात आरोपी साहिल ऊर्फ गुड्डू याच्या पत्नीने मयताबरोबर अनैतिक संबंधाची कबुली दिली. युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी साहिल ऊर्फ गुड्डू शेख याला दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड, कलम २०१ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार एस. एन. सातदीवे आणि जमादार भगवान जाधव यांनी काम पाहिले.
Web Title: Crime Update Life Imprisonment For Killing A Friend Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..