((((ग्राहक हक्क))))
फसवणूक झालीय? पण या’ मुदतीनंतर ग्राहक मंचात दाद मागितल्यास निराशा
----
आजच्या काळात वस्तू खरेदी करताना किंवा एखादी सेवा घेताना ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दोषपूर्ण वस्तू मिळणे, पैसे भरूनही सेवा न मिळणे, विम्याची रक्कम नाकारणे, ऑनलाइन खरेदीत फसवणूक होणे किंवा पैसे परत देण्यास टाळाटाळ करणे, असे प्रकार घडतात. अशावेळी ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, तक्रार दाखल करताना एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये, ती म्हणजे कायद्यातील दिलेली कालमर्यादा.
ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ च्या कलम ६९ नुसार, तक्रारीचे कारण ज्या दिवशी निर्माण झाले, त्या दिवसापासून दोन वर्षांच्या आत ग्राहक आयोगात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने पैसे भरूनही विक्रेत्याने वस्तू दिली नाही किंवा सेवा पुरविण्यात कसूर केली, तर संबंधित प्रकरणातील तथ्यांनुसार तक्रारीचे कारण निर्माण झाल्याची तारीख ठरते. प्रत्येक प्रकरणात ही तारीख सारखी असेलच असे नाही. त्यामुळे केवळ व्यवहाराची तारीख पाहून निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही.
अनेकदा ग्राहक समोरच्या व्यक्तीने प्रश्न सोडवण्याचे दिलेले आश्वासन, वारंवार होणारी चर्चा किंवा पैसे परत मिळण्याची अपेक्षा यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर करतो. मात्र, अशा प्रतीक्षेमुळे कायद्यातील मुदत आपोआप वाढत नाही. दोन वर्षांची मुदत संपली असली, तरी योग्य कारण असल्यास तक्रार दाखल करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी ग्राहकाने विलंब होण्यामागील पुरेशी कारणे स्पष्ट करून विलंबमाफीचा अर्ज करणे आवश्यक असते. विलंब माफ करायचा की नाही, याचा निर्णय ग्राहक आयोग घेतो. विलंबमाफी मिळेलच, अशीही खात्री देता येत नाही.
ग्राहकाने आपली तक्रार मांडताना व्यवहाराची तारीख, नेमकी अडचण कधी निर्माण झाली आणि संबंधित विक्रेता किंवा सेवा पुरवठादाराने काय उत्तर दिले, याचा स्पष्ट तपशील तयार ठेवावा. केवळ तक्रार करण्याचा विचार करून थांबण्यापेक्षा योग्य कायदेशीर सल्ला घेऊन वेळेत पुढील पाऊल उचलणे अधिक महत्त्वाचे ठरते.
ग्राहक संरक्षण कायदा हा अन्याय झालेल्या ग्राहकाला दिलासा मिळवून देण्यासाठी आहे. मात्र, त्या हक्काचा वापर करताना कायद्याने ठरवून दिलेल्या मुदतीची माहिती ठेवणे तितकेच आवश्यक आहे. कारण, योग्यवेळी केलेली तक्रार ही न्याय मिळविण्याच्या दिशेने उचललेली पहिली महत्त्वाची पायरी असते.
-ॲड. अमोल वाघमारे
९०६७१२९२२२