सायबर फसवणुकीला ‘सायबर साथी’चा आधार!
शिवप्रसाद जाधव आणि दीपू सिंग यांचा पुढाकार; जनजागृतीसह पीडितांना मदतीचा हात
जाफराबाद, ता. २१ : सायबर गुन्ह्यांमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सायबर तज्ज्ञ शिवप्रसाद जाधव आणि दीपू सिंग यांनी मंगळवारी (ता.२०) ‘सायबर साथी’ या उपक्रमाची सुरवात केली. सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे, फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे आणि गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असल्या, तरी ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, खोटे फोन, ओटीपीची मागणी, बनावट गुंतवणूक योजना आणि अन्य सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंतेचा विषय ठरत आहे. अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप समजत नाही. अनोळखी व्यक्तीच्या फोनवर विश्वास ठेवणे, संशयास्पद लिंकवर क्लिक करणे किंवा वैयक्तिक आणि बँकिंगविषयक माहिती शेअर करणे यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडू शकतात. अशा परिस्थितीत वेळेत योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे ठरते. ही गरज ओळखून ‘सायबर साथी’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिवप्रसाद जाधव यांनी सांगितले. दरम्यान, ‘‘सायबर गुन्ह्यांमुळे अडचणीत सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला एकटेपणा जाणवू नये, तर तिला योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळावा, हीच या उपक्रमामागील भावना आहे,” असे शिवप्रसाद जाधव आणि दीपू सिंग यांनी सांगितले.
...............
संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन
नागरिकांनी संशयास्पद लिंक उघडू नयेत आणि ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता अधिकृत सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच ८६६९७९१९३० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा cybersathi.org.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.