दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी
हक्काचा आर्थिक आधार!
----
जळकोट, ता. १५ (बातमीदार) ः यंदा पावसाने ओढ दिल्याने जळकोट तालुक्यात भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. खरीप पिके वाया गेल्याने आणि रब्बीची आशा धूसर झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात नियमित मिळणाऱ्या दुधाच्या बिलामुळे शेतकऱ्यांचा दैनंदिन घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि औषधपाणी भागत असून दुग्ध व्यवसाय हक्काचा आर्थिक आधार ठरत आहे.
शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकलेले असताना दर दहा दिवसांनी किंवा महिन्यातून मिळणारी दुधाची रक्कम आणि दूध संघांनी केलेली खरेदी दरावरील वाढ काहीसा दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागासह शहरालगतच्या अनेक बेरोजगार तरुणांनीही दुग्ध व्यवसायाचा आधार घेतला आहे. मात्र, जनावरे जगवणे मोठे आव्हान बनले आहे. पाण्याअभावी हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून कोरड्या चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच खालावलेल्या पाणीपातळीमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
हा दुग्ध व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, पशुखाद्यावर अनुदान द्यावे आणि पाण्याची योग्य सोय करावी, अशी जोरदार मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
------------------
((कोट))
दुष्काळामुळे खरिपातील पिके हातातून गेली आहेत. अशा कठीण काळात घरचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आमच्याकडे दुग्ध व्यवसाय हाच एकमेव आधार उरला आहे. दर दहा दिवसांनी दुधाचे बिल हातात येते, म्हणूनच आमचे कुटुंब तग धरून आहे. मात्र, सध्या चारा आणि पाण्याची टंचाई जाणवत असून पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. दुधाला मिळणारा भाव आणि वाढलेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांचा हा आधारवड टिकवायचा असेल, तर शासनाने तातडीने चारा व पशुखाद्यावर अनुदान देऊन दुधाला योग्य हमीभाव द्यावा.
-अरविंद नागरगोजे, दूध व्यावसायिक