दाटेगाव ग्रामपंचायत विभागात प्रथम
समृद्ध पंचायतराज अभियान ः पटकावले एक कोटीचे बक्षीस
हिंगोली, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या अभियानांतर्गत हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल १ कोटी रुपयांचे घवघवीत पारितोषिक मिळविले आहे. या ऐतिहासिक यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विभागस्तरीय यशासोबतच जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्येही ग्रामपंचायतींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. यामध्ये प्रथम क्रमांक (५० लाख रुपये): ब्रह्मपुरी ग्रामपंचायत (ता. हिंगोली), द्वितीय क्रमांक (३० लाख रुपये): वरुड चक्रपान ग्रामपंचायत (ता. सेनगाव), तृतीय क्रमांक (२० लाख रुपये): वाई तर्फे धामणगाव ग्रामपंचायत (ता. वसमत) यांना प्राप्त झाला. गावातील पायाभूत सुविधांचा विकास, शास्त्रोक्त जलव्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता, व्यापक लोकसहभाग आणि विविध शासकीय कल्याणकारी योजनांची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी या निकषांच्या आधारे ग्रामपंचायतींचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले होते. या सर्व कसोट्यांवर हिंगोलीच्या ग्रामपंचायतींनी अव्वल कामगिरी नोंदवली.
चौकट
ग्रामीण विकासाला नवी दिशा
या पुरस्कारांमुळे हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला नवी गती व प्रेरणा मिळणार असून, इतर ग्रामपंचायतींसमोरही विकासकामांचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. या देदीप्यमान यशाबद्दल जिल्हाभरातून विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लवकरच एका विशेष सोहळ्यात पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.