Aurangabad : पर्यटकांसह भाविकांची पाऊले वळली पैठणनगरीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nath mandir paithan

पर्यटकांसह भाविकांची पाऊले वळली पैठणनगरीकडे

पैठण : कोरोनामुळे बंद असणारे राज्यातील धार्मिक व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. यामुळे हिवाळी पर्यटनाला बहर आला आहे. सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून पर्यटनासाठी नागरिक मोठ्या संख्येने ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात मोठ्या संख्‍येने येत असल्याचे चित्र आहे. कोरोना काळानंतर पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.

शहरातील आशिया खंडातील जायकवाडी धरणाचा नाथसागर, जगप्रसिद्ध पैठणी साडी, संत ज्ञानेश्वर उद्यान, शांतीब्रम्ह संत श्री एकनाथ महाराज समाधी मंदिर आदी स्थळांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्याने नागरिक धार्मिक स्थळांसह पर्यटनाला प्राधान्य देत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमुळे तब्बल आठ ते नऊ महिने इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे बंद होती. २०२० च्या दिवाळीत कोरोनाचा कहर कमी झाल्याने इतर क्षेत्रांप्रमाणे पर्यटनही खुले झाले. हिवाळी हंगामानंतर कोरोनाची दुसरी लाट वाढल्याने मार्च २०२१) ला पुन्हा सर्व क्षेत्रे बंद करण्यात आली. सहा ते सात महिन्यांनी लाट ओसरल्याने नवरात्र उत्सवात पुन्हा सर्व क्षेत्रे खुली करण्यात आली.

पर्यटन तसेच धार्मिकरित्या महत्त्वाच्या असलेल्या पैठणनगरीत नागरिकांचा येण्याचा ओढा वाढत असल्याने नवी उभारी मिळाली आहे. पैठणच्या पर्यटनाचे देशभरातील पर्यटकांना आकर्षण आहेच. त्यामुळे हिवाळी पर्यटन हंगामाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच येथील धार्मिक स्थळांवरही येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने येत्या काही दिवसांत कोरोनात झालेल्या नुकसानीची थोडीफार हा होईना भरपाई होईल, अशी आशा आहे.

- पवन लोहिया, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, पैठण.

अनेकांना रोजगाराची संधी

पर्यटनाच्या हंगामातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने पर्यटनावर अवकळा पसरली होती. मात्र, पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने पुन्हा ''अच्छे दिन'' येण्याचे संकेत आहेत. पर्यटनाला चालना मिळाल्याने अनेकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच पैठण शहरातील हॉटेल, शीतपेयांची दुकाने, घरगुती खानावळी, खाद्यपदार्थाची विक्री वाढल्याने व दोन पैसे मिळाल्याने व्यावसायीक आनंदित आहेत

loading image
go to top