Aurangabad News : हजारो किलोमीटर प्रवास करीत देणार आरोग्य संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dinkar Bhikaji Birari

Aurangabad News : हजारो किलोमीटर प्रवास करीत देणार आरोग्य संदेश

औरंगाबाद : देशातील तरुण पिढी निर्व्यसनी आणि निरोगी राहावी ही आजच्या काळाची गरज आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातील निवृत्त क्षेत्रीय अधिकारी दिनकर भिकाजी बिरारी तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहेत.

याची सुरुवात शुक्रवारपासून (ता.३०) झाली आहे. सिडको कार्यालयातील निवृत्त क्षेत्रीय अधिकारी दिनकर भिकाजी बिरारी यांनी हा उपक्रम निवृत्तीनंतर सुरू केला. यात साडेचार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास बिरारी करणार आहेत.

नर्मदा परिक्रमा ही साडेतीन हजार किलोमीटरची यात्रा ते सायकलीवर करणार आहेत. ओंकारेश्वर, अमरकंटक परत ओंकारेश्वर ते औरंगाबाद असा प्रवास ते तीन महिन्यांमध्ये पूर्ण करणार आहेत. रोज शंभर किलोमीटर सायकल चालवायचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.

श्री. बिरारी म्हणतात, की ६६ व्या वर्षीदेखील मी निरोगी आहे. यामुळे माझा देशही निरोगी असावा अशी माझी इच्छा आहे. औरंगाबाद पासून परिक्रमापर्यंत चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहे.

यामध्ये प्रवासादरम्यान व्यसनाधीनता आणि योगासना संदर्भात जनजागृती करणार आहे. त्यांच्यासोबत सायकल, स्लिपिंग बॅग, दोन कपडे, पाणी बॉटल इत्यादी साहित्य सोबत असणार आहे.

माझा देशही निरोगी असावा अशी माझी इच्छा आहे. आता माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती मला देशाचे तरुण निर्व्यसनी आणि देश निरोगी व्हावा यासाठी ती ऊर्जा खर्च करायची आहे, हे उद्दिष्ट समोर ठेवून मी औरंगाबादपासून परिक्रमा करणार आहे.

- दिनकर बिरारी, सेवानिवृत्त अधिकारी