esakal | कांद्याच्या रोपांना रोगांची लागण; बियाणांचा दर वाढतोय, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Kanda Rope

कांदा रोप अतिवृष्टी आणि मर बुरशी रोगामुळे खराब होत चालल्याने पुढील काळात कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा निर्माण होणार आहे.

कांद्याच्या रोपांना रोगांची लागण; बियाणांचा दर वाढतोय, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

sakal_logo
By
जमील पठाण

कायगाव (जि.औरंगाबाद) : कायगाव, अगरवाडगाव (ता.गंगापूर) परिसरात शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा रोप अतिवृष्टी आणि मर बुरशी रोगामुळे खराब होत चालल्याने पुढील काळात कांदा लागवडीसाठी रोपांचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यात कांदा बियाणांचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दुप्पट-तिप्पट पैसे मोजूनही कांदा बियाणे मिळेनासे झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

अडला शेतकरी..व्यापाऱ्यांचे पाय धरी! 

गोदाकाठच्या जामगाव, कायगाव, अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, भिवधानोरा, अगरवाडगाव, धनगरपट्टी या भागात झालेल्या सततच्या पावसाने कांदा रोप धोक्यात आले असून पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. कांदा रोपाच्या माना वाकड्या होणे, बुरशी लागणे, मुळे सडणे असे प्रकार होत आहेत. रोप वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या खते, औषधी फवारणीचा वापर करत आहेत. मात्र, औषधाची मात्रा पूर्ण क्षमतेने लागू पडत नाही.


मागील वर्षी राज्यभर परतीच्या पावसाने कहर केल्याने म्हणावे तसे कांदा बीजोत्पादन झालेच नाही. त्यामुळे कांदा बियाणांचे दर वाढले. यंदाही तिच स्थिती आहे. तसेच यंदा खरीप कांदा लागवड वाया गेली. उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. अनेकांनी महागडे कांदा बियाणे टाकले. यंदाही अतिपावसाने बियाणे सडले.


सततच्या पावसाने कांदा व इतर खरीप पिकांची हानी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षेवर पाणी फेरले आहे.
- पोपटराव गाडेकर, माजी उपसभापती, गंगापूर

यंदा अतिपावसाने शेतातच बियाणे सडले. उगवलेले रोपही खराब होत आहे. त्यामुळे गाठी असलेले कांदा बियाणे संपल्याने शेतकऱ्यांना नवीन बियाण्यांसाठी धावपळ करावी लागत आहे.
-पांडुरंग वाघ, कांदा उत्पादक, अगरवाडगाव

संपादन - गणेश पिटेकर