पान १ लीड
----
जिल्हा रुग्णालय फायर सेफ्टी ऑडिटमध्ये नापास
प्रशासनाचा खेळ सुरूच, जिल्हा शल्यचिकित्सकांना कारवाईचा इशारा
----
सुरक्षेचा पुरता बोजवारा
गंभीर त्रुटी उघड
अग्निशामक सिलिंडर्सची मुदत संपली
मॉक ड्रिलचा पत्ता नाही
आगीचा भडका उडाल्यास जबाबदार कोण?
अतिदक्षता कक्ष अन् नवजात बालक कक्ष वाऱ्यावर
--------
नितीन चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ४ : सध्या राज्यभरात विविध ठिकाणी घडणाऱ्या अग्निकांडाच्या भीषण आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनांनंतर एकीकडे शासन आणि प्रशासन जागे होऊन सर्वत्र सेफ्टी ऑडिटचे सोपस्कार युद्धपातळीवर पार पाडत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे बीड जिल्ह्याचे मुख्य आरोग्य केंद्र असलेल्या आणि हजारो रुग्णांचा आधार असलेल्या बीड जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नुकत्याच सलग तीन दिवस चाललेल्या सखोल फायर सेफ्टी ऑडिटमध्ये बीड जिल्हा रुग्णालय थेट नापास ठरले आहे. या तपासणीत रुग्णालयाच्या कामकाजात आणि सुरक्षा व्यवस्थेत अनेक मेजर (गंभीर) त्रुटी उघडकीस आल्या आहेत. प्रशासनाचा हा जीवघेणा हलगर्जीपणा पाहून, खरोखरच एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा संतप्त आणि उद्विग्न सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत, तसेच नवीन माता व बाल संगोपन केंद्र इमारतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जागोजागी लावण्यात आलेली अग्निशामक सिलिंडर्स (नळकांडी) आणि स्प्रिंकलर्सची यंत्रणा गेल्या कित्येक वर्षांपासून योग्य देखभाल आणि दुरुस्तीअभावी अक्षरशः धूळखात पडली आहे. रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाच्या अग्निशामक यंत्रांची पुनर्भरणी (रिफिलिंग) आणि दुरुस्ती करून अनेक वर्षे उलटून गेली आहेत. उद्या दुर्दैवाने आणीबाणीची वेळ ओढवली, तर ही उपकरणे प्रत्यक्षात चालतील की नाही, याची कोणतीही खात्री खुद्द प्रशासनालाही नाही. जुन्या इमारतीत तर छतावर आणि भिंतीवर लटकणाऱ्या विजेच्या उघड्या तारा, अनेक वर्षे जुने झालेले स्विचेस आणि त्यामुळे शॉर्टसर्किटचा सातत्याने राहणारा धोका, यामुळे हे संपूर्ण रुग्णालय म्हणजे एक प्रकारे जिवंत मृत्यूचा सापळाच बनले आहे. स्थानिक नगरपालिका आणि अग्निशमन विभागाकडून मिळणारी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र प्रशासनाने अद्याप मिळवलेली नाही. इलेक्ट्रिकल ऑडिट न झाल्यामुळे रुग्णालयाच्या डोक्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार आहे.
ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातून दररोज हजारो निष्पाप रुग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी येतात. विशेषतः अतिदक्षता विभाग, नवजात बालकांचा कक्ष आणि गरोदर महिलांच्या वॉर्डमध्ये अत्यंत गंभीर रुग्ण असतात. अग्निशमन यंत्रणेची बिकट अवस्था आणि प्रशासनाच्या या कमालीच्या उदासीनतेमुळे नवजात बालकांचा, मातांचा आणि रुग्णांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.
-----
काही घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात. अतिदक्षता विभाग आणि नवजात बालकांच्या कक्षात गंभीर रुग्ण असताना, दुर्दैवाने आगीची एखादी दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्यासाठी पुरेसे आणि सुरक्षित मार्गही रुग्णालयात उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी अडगळीचे, तुटलेले सामान टाकून आपत्कालीन मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. आपत्कालीन मार्गच अडवल्याने एखादी घटना घडल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो. प्रशासन नेमकी कोणती मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-----
अचानक आग लागल्यास धावपळ निश्चित
बीड जिल्हा रुग्णालयात केवळ उपकरणांचीच दुरवस्था नाही, तर आपत्कालीन प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यासाठी येथील आरोग्य कर्मचारीही पूर्णपणे अप्रशिक्षित आहेत. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना आग लागल्यास ती कशी विझवायची किंवा रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढायचे, याचे कोणतेही मॉक ड्रिल (प्रात्यक्षिक शिक्षण) आजवर देण्यात आलेले नाही. अतिदक्षता विभाग आणि बाल संगोपन कक्षात आपत्कालीन स्थितीत ही जुनाट यंत्रणा कशी वापरणार, हा मोठा प्रश्न आहे. आपत्कालीन नियोजनाअभावी अनुचित घटना घडल्यास प्रचंड पळापळ आणि मोठी जीवितहानी होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे.
------
कोट
बीड जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे अधिकृत फायर सेफ्टी ऑडिट पूर्ण झालेले नाही. या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना तत्काळ लेखी पत्र देऊन रुग्णालयातील सर्व फायर सिस्टीम, विद्युत ऑडिट आणि अग्निशमन नळकांड्यांची तातडीने दुरुस्ती करून घेण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. विहित मुदतीत या सर्व त्रुटींची पूर्तता न केल्यास आणि आवश्यक एनओसी न घेतल्यास, नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- किशोर जाधव, अग्निशमन अधिकारी, बीड