दिवाळीसाठी शेतकऱ्यांना
देणार किराणा किटची भेट
------------
छत्रपती संभाजीनगर, ता. २५ ः दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी अखिल भारतीय बळिराजा संघटनेच्या वतीने किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी निधी संकलन करून गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोचविण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
या संदर्भात एका खासगी क्लासेसमध्ये रविवारी (ता. २५) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त मदत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे ठरविले. बैठकीला मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र तांबे पाटील, जिल्हाध्यक्ष सुखदेव कदम पाटील, शहर जिल्हाध्यक्ष उद्धव सावरे पाटील, शहर सचिव दीपक वैष्णव, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बापट, महिला शहर अध्यक्ष मीरा गाडेकर, महिला कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा भोसले आणि सचिव माधुरी साळुंके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हाध्यक्षपदी किरण तायडे पाटील, पुणे शहर महिला अध्यक्षपदी जयश्री किरण तायडे पाटील, तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक अध्यक्षपदी सागर मस्के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राजेंद्र तांबे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुखदेव कदम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.