आतषबाजी करताना आरोग्य जपा
-
घातक धुरामुळे दमा, श्वसनविकार बळावण्याची भीती; सावधगिरीचा सल्ला
हिंगोली, ता. ८ : दिवाळीचा सण आनंद, उत्साह आणि रोषणाईची उधळण घेऊन आला असला, तरी फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि विषारी धूर यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे फुप्फुसांवर थेट परिणाम होत असून श्वसनविकार, दमा, ब्राँकायटिस आणि ‘सीओपीडी’च्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे फटाके फोडताना श्वसनसंस्थेसह कान आणि डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन हिंगोलीतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
दिवाळीनिमित्त घरोघरी सुरू असलेली साफसफाई, रंगरंगोटी आणि जुन्या गाद्या झाडताना हवेत उडणारे सूक्ष्म धूलिकण ॲलर्जी व दम्याच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरतात. त्यातच फटाक्यांच्या धुरात सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड यांसारखे घातक रासायनिक घटक असतात. यामुळे हवेचे प्रदूषण वाढून घसा खवखवणे, तीव्र खोकला, डोळ्यांत जळजळ होणे, त्वचेवर खाज सुटणे व श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे अशी लक्षणे दिसून येतात.
चौकट
नागरिकांनी ही खबरदारी बाळगावी
- दमा, सीओपीडी किंवा श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी फटाक्यांच्या धुरापासून दूर राहावे.
- घरातील धूळ टाळावी व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.
- फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवावे; लहान मुलांवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे.
- आवाज आणि धूर करणाऱ्या फटाक्यांऐवजी दिव्यांची रोषणाई करून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी.
------
प्रतिक्रिया
फटाका फुटून डोळ्याला ठिणगीमुळे इजा झाल्यास डोळा अजिबात चोळू नये; अन्यथा डोळ्यातील नाजूक द्रव बाहेर येण्याचा किंवा फसलेले कण अधिक खोल जाण्याचा धोका असतो. अशा वेळी डोळा साध्या पाण्याने धुणे किंवा घरगुती मलम लावणे टाळावे, यामुळे जंतुसंसर्ग वाढू शकतो. कोणतीही इजा झाल्यास त्वरित नेत्ररोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
- डॉ. किशन लखमावार,
नेत्ररोगतज्ज्ञ, हिंगोली
------
प्रतिक्रिया
सध्या ऋतू बदलत असल्याने शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. अशा स्थितीत दिवाळीतील फटाक्यांचा रासायनिक धूर श्वसनाशी संबंधित आजार बळावण्यास कारणीभूत ठरतो. सणाचा आनंद साजरा करताना फटाक्यांचा विषारी धूर व घरातील धूळ टाळणे हे फुप्फुसांच्या व हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत हिताचे आहे.
- डॉ. पवनकुमार गिरी,
छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जीतज्ज्ञ, हिंगोली
------
प्रतिक्रिया
फटाक्यांच्या अतिप्रचंड आवाजामुळे कानाचे पडदे फाटण्याची किंवा पडद्याला बारीक छिद्र पडण्याची भीती असते. यामुळे तात्पुरता अथवा कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. कधीकधी हे छिद्र उपचाराने आपोआप भरते; मात्र छिद्र मोठे असल्यास अथवा पडदा फाटल्यास गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची वेळ येते. त्यामुळे मोठा आवाज करणारे फटाके टाळणेच हिताचे आहे.
- डॉ. प्रशांत झाडे,
कान-नाक-घसारोगतज्ज्ञ, हिंगोली