दिवाळीत कोटींची उड्डाणे

दिवाळीत कोटींची उड्डाणे
Published on: 
टुडे मेन -- दिवाळीत कोटींची उड्डाणे ---- - लातुरातील उलाढाल पोचली १९० कोटींवर - सणानिमित्त नागरिकांच्या उत्साहाला उधाण - वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू व घर खरेदीची धूम --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १२ : दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळीत शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची तुडुंब गर्दी पहायला मिळाली. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असले, तरी बाजारपेठेत उत्साहाला उधाण आले होते. यात प्रामुख्याने अनेकांनी नवीन घराचे आणि नवीन वाहनाचे स्वप्न पूर्ण केले, तर काहींनी सोने व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर भर दिला. त्यामुळेच दिवाळीत १९० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापारी व विक्रेत्यांमधून वर्तविला जात आहे. दिवाळी हा मनामनांत आनंद फुलविणारा, चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा उत्सव आहे. या सणाला पाच नोव्हेंबरपासून सुरवात झाली. तेव्हापासून ११ नोव्हेंबरपर्यंत शहरातील व जिल्ह्यातील बाजारपेठेत चांगलीच लगबग दिसून आली. यंदा दुष्काळाचा बाजारपेठेवर परिणाम होईल, अशी चिंता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात होती. मात्र, लातूरकरांनी नकारात्मकता बाजूला सारून दिवाळी ही नेहमीप्रमाणे उत्साहाने साजरी केली. मागीलवर्षी ओल्या दुष्काळाचे सावट असतानाही लातूकरांमधून बाजारपेठेत चांगलाच प्रतिसाद होता. तसाच प्रतिसाद यंदाही पहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून व्यक्त करण्यात आली. ---- ‘ईव्ही’कडे वाढला कल ‘जया ह्युंदाई’चे व्यवस्थापक राहुल झुंजे म्हणाले, यंदा दसऱ्याप्रमाणेच दिवाळीलाही वाहनखरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. दसऱ्याला २५० हून अधिक कारची विक्री झाली होती, तर दिवाळीला ३०० हून अधिक कारची विक्री झाली. त्यामुळे ऐन दिवाळीत कार खरेदीत ४० कोटींची उलाढाल झाली. पेट्रोलचे वाढलेले दर लक्षात घेऊन बऱ्याच जणांचा ‘ईव्ही’ घेण्याकडे कल वाढला आहे. शहरात चार्जिंग स्टेशन्स वाढल्याने आणि घरातही चार्जिंग करणे सोपे असल्याने अशा वाहनांना चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान, कारबरोबरच दुचाकी खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. दोन हजारहून अधिक दुचाकींची विक्री झाल्याचा अंदाज वाहन बाजारातून वर्तविण्यात आला. ---- घराचे स्वप्न झाले पूर्ण दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन घराचे स्वप्न पूर्ण केले. मूळचे लातूरचे असलेले; पण इतर जिल्ह्यांत राहणाऱ्यांनी लातुरात गुंतवणूक म्हणून फ्लॅट, रो-हाऊस, प्लॉट घेण्याला पसंदी दर्शविली. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात दिवाळीच्या काळात १०० कोटींहून अधिक उलाढाल झाली. असाच प्रतिसाद सोने खरेदीलाही लाभला. दिवाळीच्या दिवसांत सोने खरेदीत २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज विविध सराफ व्यावसयिकांनी वर्तविला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कपडे खरेदीसाठीही ग्राहकांची तुडुंब गर्दी शहरात ठिकठिकाणी दिसली. व्यापारी-विक्रेत्यांनी वेगवेगळ्या सवलतींचा वर्षावच दिवाळीत सुरू केला होता. त्यामुळे खरेदीला प्रतिसाद वाढत राहिला. या उद्योगात १८ ते २० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात मोबाइल, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल पाहायला मिळाला. --- ((कोट)) यंदा दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याचा काहीसा परिणाम बाजारपेठेत नक्कीच पहायला मिळाला. पण, त्याबरोबरच उत्साहही मोठा होता, हे नाकारता येणार नाही. बाहेरून लातुरात येणाऱ्यांपैकी अनेकांचा गुंतवणूक म्हणून फ्लॅट, रो-हाऊस, बंगला, मोकळी जागा घेण्याकडे कल दिसून आला. - उदय पाटील, अध्यक्ष, क्रेडाई ---- ((कोट)) सोने खरेदीसाठी दिवाळीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता. शिवाय, लग्नसराईही सुरू झाल्याने अनेकांनी त्याचीही खरेदी सुरू केली आहे. दागिने घेण्याबरोबरच ठोक सोने किंवा नाणी घेण्याकडे ग्राहकांचा कल होता. - कौस्तुभ ताथोडे, सराफ व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.