‘नॅचरल’च्या सभासदांना दिवाळी गोड
साखर व शुद्ध तुपाचे सवलतीच्या दरात वाटप सुरू
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २८ : नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर (रांजणी) कारखान्याच्या सभासदांना दिवाळी उत्साहात साजरी करता यावी, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सवलतीच्या दरात साखर आणि शुद्ध तुपाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
कारखान्याकडून सभासदांना त्यांच्या भागभांडवलाच्या (शेअर्स) प्रमाणात ३५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात साखर दिली जात आहे. १०० शेअर्ससाठी १० किलोप्रमाणे एकूण शेअर्स धारण संख्येच्या प्रमाणात साखरेचे वाटप बुधवारपासून (ता.२८) सुरू करण्यात आले असून ६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत कारखान्याच्या शेती विभागाच्या संबंधित गट कार्यालयांमधून केले जाणार आहे.
याशिवाय, नॅचरल डेअरीच्या माध्यमातून गाईचे शुद्ध तूपही ६०० रुपये प्रति लिटर या सवलतीच्या दरात प्रति सभासद अर्धा ते एक लिटर या प्रमाणात दिले जात आहे. नॅचरल शुगरच्या सर्व सभासदांनी संबंधित गट कार्यालयाशी संपर्क साधून निर्धारित मुदतीत साखर व तूप घेऊन वाटप प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे. तसेच साखर व तूप घेण्यासाठी येताना सभासदांनी स्वतःच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड अथवा भाग प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे कारखान्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.