दिवाळीच्या सुट्यांनी पर्यटन जोरात
आठवडाभरात लेणी, किल्ल्यावर दीड लाखाहून अधिक पर्यटकांची हजेरी
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ : दिवाळीच्या सुट्यांचा उत्साह यंदा पर्यटन क्षेत्रासाठी सुवर्णकाळ ठरला आहे. शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना असलेल्या सलग सुट्यांमुळे गेल्या आठवडाभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक वारसास्थळे आणि ऐतिहासिक वास्तूंवर पर्यटकांची गर्दी लोटल्याचे पाहायला मिळाले. या काळात तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या असून, यातून पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा ‘बूस्टर’ मिळाला आहे.
दिवाळीच्या मुख्य सुट्यांच्या काळात अर्थात १० ते १२ नोव्हेंबर या अवघ्या तीन दिवसांत ७५ हजारांहून अधिक पर्यटकांनी येथील ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली. अजिंठा व वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला आणि औरंगाबाद (बुद्ध) लेणी येथे पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली.
लाखोंचा महसूल, स्थानिकांना रोजगार
पर्यटकांच्या या उदंड प्रतिसादामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला तिकीट विक्रीतून मोठा महसूल प्राप्त झाला आहे. मुख्य तीन दिवसांतच तिकीट विक्रीतून खात्याला सुमारे २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, आठवडाभरातील एकूण आकडा आणखी मोठा आहे. या पर्यटनाचा थेट फायदा स्थानिक घटकांना झाला आहे.
---------
हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल एजन्सी, स्थानिक गाइड, हस्तकला व खाद्यपदार्थ विक्रेते यांना चांगला रोजगार मिळाला. तसेच, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि विमानतळावरही प्रवाशांची मोठी गर्दी होती. पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांची मागणी वाढल्याने वाहतूक क्षेत्रालाही मोठी आर्थिक चालना मिळाली.
----
पुढील महिन्यातही होईल गर्दी
‘‘समृद्धी महामार्ग आणि सोलापूर-धुळे महामार्गासह रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट झाल्यामुळे पर्यटकांना छत्रपती संभाजीनगर गाठणे अत्यंत सोयीचे झाले आहे. ७ आणि ८ नोव्हेंबरला आलेला शनिवार-रविवार आणि त्यानंतर लागून आलेल्या दिवाळीच्या सुट्यांमुळे पर्यटकांची संख्या विक्रमी झाली. आगामी ख्रिसमसच्या सुट्यांमध्येही अशीच मोठी गर्दी पाहायला मिळेल. पर्यटन विभागाकडून ई-बस सेवा सुरू झाल्यास आणखी प्रतिसाद वाढेल.
- जसवंतसिंग राजपूत, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन
----
१० ते १२ नोव्हेंबरची पर्यटक संख्या
वेरूळ लेणी : २३,७००
बीबी का मकबरा : १८,७६१
अजिंठा लेणी : १४,७६१
देवगिरी किल्ला : ९,८८५
बुद्ध लेणी : २,५७६
-----
असे आहेत तिकीट दर
अजिंठा आणि वेरूळ लेणी : ४० रुपये प्रति व्यक्ती
बीबी का मकबरा, देवगिरी किल्ला व बुद्ध लेणी : २५ रुपये प्रति व्यक्ती