शहरवासीयांनो, आता तरी बोंबलत फिरू नका!

औरंगाबादः लॉकडाऊन, संचारबंदी असतांना ही त्याचे सर्रापणे उल्लंघन करुन धोकादायक असलेल्या हर्सुल तलावात तरुण पोहत आहे.
औरंगाबादः लॉकडाऊन, संचारबंदी असतांना ही त्याचे सर्रापणे उल्लंघन करुन धोकादायक असलेल्या हर्सुल तलावात तरुण पोहत आहे.

औरंगाबाद - अखेर शहरात ‘कोरोनाकंप’ झालाच! का झाला? कसा झाला? कुणामुळे झाला? या प्रश्‍नांची चर्चा होणे गरजेचे असले तरी, त्यापेक्षा आता या क्षणापासून तरी शहरवासीयांनी ‘कोरोना’ गांभीर्याने घेण्याची नितांत गरज आहे. शंभराच्यावर पॉझिटिव्ह रुग्ण शहरात सापडलेत, सात जणांचा बळी गेलाय. म्हणून आता तरी उगाच बोंबलत फिरू नका. किराणा आणायचाय, भाजीसाठी बाहेर जातोय, मेडिकलमधून एक गोळी आणायचीय या सबबीखाली काही काळासाठी तरी बाहेर जाणे बंद करा, असे आवाहन पोलिस तसेच आरोग्य प्रशासनाने केले आहे.

पिशव्या घेऊन पडतात बाहेर!

मेडिकल इमर्जन्सी असेल, कर्तव्यावर जायचे असेल तर सर्व खबरदारी घेऊन बाहेर जाण्यास कुणीही अडवत नाही. पोलिसांनीही सर्वसामान्य नागरिकांना किराणा, भाजी, दूध वगैरे जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी परवानगी दिलेली आहेच. पण, काही महाभाग उगाच एखादी पिशवी हातात घेऊन, दुचाकीला थैली लटकवून मास्क न लावता विनाकारण बाहेर पडतात. किराणा साहित्य ही काय रोज आणायची वस्तू आहे का? एकदा दुकानात गेल्यानंतर महिन्याचा, नाही तर कमीत कमी आठ दिवसांचा किराणा आपण भरू शकतो. भाजीपालाही चार-दोन दिवसांचा आणून ठेवू शकतो. मेडिकलवर एकदा गेल्यानंतर घरात असाव्यात म्हणून किरकोळ आजाराच्या गोळ्या-औषधी आणून ठेवता येतात. पण, सांगणार कोण अन् ऐकणार कोण, अशी परिस्थिती शहरात आहे. असे वागणारांमुळे खऱ्या गरजूंनाही बाहेर पडताना अडचणी येतात.

जुन्या शहरात गर्दी, गल्लोगल्ली बर्म्युडे!

लॉकडाउनच्या काळातही जुना शहर परिसर, चेलीपुरा चौक, सिटी चौकाचा काही भाग, बुढीलेन, कटकट गेट, रोशन गेटचा परिसर, जयभवानी नगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानक रस्ता, गजानन महाराज मंदिर परिसर, चिकलठाण्यासह मुकुंदवाडी-रामनगरचा आतील भाग, सिडकोचा काही परिसर या ठिकाणी सकाळी-संध्याकाळी जणू काही कोरोनाच नाही, अशा पद्धतीने काहीजण किरकोळ कारणांसाठी उंडारतात. अंतर राखण्याचा कुणीही विचार करीत नाही. मॉर्निंग अन् इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली शेकडो ‘बर्म्युडे’ गल्लोगल्ली, रस्तोरस्ती हमखास नजरेस पडतात. आपल्यामुळे संसर्ग वाढू शकतो किंवा आपल्यालाच कुणाकडून संसर्ग होऊ शकतो, याचे गांभीर्य त्यांना नाही. हर्सूल परिसरात तर तरुण पोरं खुश्‍शाल पोहायला जाताहेत. आता अवघे शहरच ‘हॉटस्पॉट’ बनण्याच्या मार्गावर असल्याने अशांना आवर घालणे गरजेचे झाले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी जिवाची बाजी लावून लढत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायची ही वेळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com