डॉ. नागेश लखमावार
यांचे निलंबन केले रद्द
-पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदी पदस्थापना
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ३ : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्यावरील निलंबनाची कारवाई सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली. त्यांना पुन्हा परभणी जिल्हा शल्यचिकित्सक या मूळ पदावर पदस्थापना देण्याचा आदेश बुधवारी (ता.दोन) रात्री विभागाने जारी केला.
जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला, तिच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत रुग्णवाहिका चालकांसह संबंधित वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लखमावार यांच्याविरुद्धही कारवाई केली होती. या प्रकरणात डॉ. लखमावारांना निलंबित केले होते मात्र त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई आता सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली असून, त्यांना पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रकरणात चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याच प्रकरणात निलंबन रद्द करून पुन्हा मूळ पदावर नियुक्ती करण्यामागील कारणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. डॉ. लखमावार यांच्यावरील निलंबन नेमक्या कोणत्या कारणांच्या आधारे रद्द करण्यात आले, चौकशीतील निष्कर्षांमध्ये काय बदल झाला, तसेच संबंधित इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे काय झाले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील कारवाईची पुढील दिशा काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.
--------