चपातीसह भाकर झाली महाग!
----
महिनाभरात गव्हाच्या दरात हजार तर ज्वारीत ७०० रुपयांनी वाढ
--
जळकोट, ता. ३ (बातमीदार) ः दुष्काळी परिस्थितीचा फटका केवळ शेती आणि पाणीटंचाईपुरता मर्यादित राहिला नसून, आता तो सर्वसामान्यांच्या रोजच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांच्या दैनंदिन जगण्याचा आधार असलेली चपाती आणि भाकरीही आता महागली आहे. महिनाभरापूर्वी मोंढ्यात २६०० रुपये असलेला गव्हाचा दर ३६०० तर ज्वारीचा दर २५०० रुपयांवर ३२०० रुपये प्रतिक्विंटलवर गेला आहे.
यंदा पावसाअभावी खरीप हंगाम संकटात आहे. अनेक भागांत सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठीही पुरेसा ओलावा आणि पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी, बाजारात जुन्या ज्वारीचा दर प्रति क्विंटल सुमारे साडेतीन हजार रुपयांपर्यंत, बाजरी सुमारे ३२०० तर गहू सुमारे ३६०० रुपये प्रतिक्विंटल झाल्याचे चित्र आहे. यामुळे रोजचे अन्नधान्य खरेदी करताना सर्वसामान्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यासोबतच खाद्यतेल, लाल मिरची, आणि इतर किराणा साहित्याच्या वाढत्या दरांनी घरखर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. दुष्काळामुळे एकीकडे उत्पन्नाचे साधन कमी होत असताना दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने कष्टकरी कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली आहे. घरातील मुलांचे शिक्षण, आरोग्य, वीजबिल प्रवास आणि इतर खर्च भागविल्यानंतर अन्नधान्यासाठी पैसा उरणे कठीण झाले आहे.
-----------------
जीवनावश्यक वस्तूंची मागणी
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. रेशन दुकानांमार्फत पुरेशा प्रमाणात धान्य उपलब्ध करून द्यावे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
--------
तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर
ग्रामीण भागात रोजगारासाठी अन्य पर्याय नसल्याने हाताला मिळेल ते काम करून शेतकऱ्यांना कुटुंबाचा गाडा हाकावा लागतो. यंदा हिरवी शेती ओसाड झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे नैराश्यातील तरुण आता पोट पाणि व रोजगाराच्या शोधात शहराकडे जाण्याच्या तयारीत आहेत.
---------------
मजुरांना रोजगाराची, शेतकऱ्यांना कर्जाची चिंता
चांगल्या पावसाच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी खते, बियाणे आणि मशागतीसाठी खासगी सावकार, बॅँका व सोसायटी कर्ज, उसनवारीवर व्यवहार केले होते. मात्र पाऊस न पडल्याने पिके पूर्णपणे हातची गेली. त्यामुळे हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. तर, काम नसल्याने हातात पैसा नाही, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतमजूर वर्गाच्या अडचणी वाढल्या आहेत.