Sambhaji Nagar News : वेदनांनी विव्हळली घाटी

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळित शस्त्रक्रिया रद्द, रुग्ण त्रस्त वार्डांची धुरा नर्सिंग विद्यार्थ्यांच्या खांद्यावर
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घाटी म्हणजे गोरगरीब रुग्णांचा आधार. गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण येथेच वेदनामुक्त होतात. पण आज चित्र उलट होते. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या, दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या वेदनांनी अवघी घाटी दिवसभर विव्हळल्याचे दिसून आले. कारण होते जुन्या पेन्शनसाठी नर्सिंग स्टाफ संपावर गेल्याचे. परिचारिका, कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होत काम बंद ठेवले. परिणामी रुग्णांचे प्रचंड हाल झाले. काही शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. अनेक वार्डांची धुरा तर नर्सिंगच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या खांद्यावर दिल्याचे दिसून आले.

डॉक्टरच बनले सिस्टर-ब्रदर

आंदोलनात घाटीतील सुमारे ७०० हून अधिक परिचारिका, साडेतीनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे प्रसुती व शस्त्रक्रिया विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळाली. नर्सिंग स्टाफ नसल्याने चक्क येथील डॉक्टरांनाच नर्सिंग स्टाफचे काम करावे लागले.

सुमारे तासभर मृतदेह अपघात विभागातच

वाळूज परिसरातील एका रुग्णाला अपघात विभागात तपासणीसाठी आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या रुग्णासमवेत महिला नातेवाईक होती. एकतर रुग्ण दगावल्याचा धक्का त्यांना बसलेला, त्यात मृतदेह कसा हलवणार? सुमारे तासाभरात त्यांचे काही नातेवाईक आले. त्यात युवकांचा समावेश होता. त्यांनी स्वतः मृतदेह स्ट्रेचरवरून अपघात विभागाबाहेर आणला. पुढे रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. हे चित्र पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू आले होते.

म्हणाले... रुग्णाला येथून हलवावे लागेल

वैजापूर येथून एक वयस्कर व्यक्ती अपघात विभागात दाखल झाला. त्यांच्या पायाला इजा झाली होती. त्यांना मधुमेह असल्याने तत्काळ शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. परंतु, अपघात विभागात नर्सिंग स्टाफ नसल्याने, नर्सिंगचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी तेथे बसवल्याचे दिसून आले. यात शिवा ट्रस्टचे दोन, पॅरामेडिकलचे चार, घाटी नर्सिंगचे दोन असा विद्यार्थी स्टाफ होता. त्यांच्या सहकार्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पुढे स्टाफ नसल्याने त्यांना इतरत्र हलवण्याची सूचना नातेवाईकांना देण्यात आली. याबाबत नातेवाईकांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला.

मिनी घाटीत रंगले मानापमान नाट्य

संपात जिल्हा रुग्णालयातील ९८ परिचारिका आणि १४ इंचार्ज यांनी सहभाग नोंदविला. रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी ठिय्या मांडला. परंतु, या आंदोलनाचा रुग्णसेवेवर फारसा परिणाम दिसून आला नाही. दुसरीकडे दोन संघटनांच्या श्रेय वादामध्ये संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या परिचारिकांमध्ये बाचाबाची झाली. अन्य परिचारिकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु, दिवसभर या मानपमान नाट्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

कामगार रुग्णालयातही हीच स्थिती

कामगार रुग्णालयातील समवैद्यकीय, परिचारिका, लिपिक संवर्ग आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी १०० टक्के संपावर होते. केवळ तीन कंत्राटी परिचारिका आणि इतर कंत्राटी कर्मचारीवर्ग कामावर होते. दुसरीकडे वॉर्डमध्ये एकही रुग्ण भरती नसल्याची माहिती देण्यात आली.

६५३ नर्सिंग स्टाफपैकी आठ कर्मचारीच कामावर होते. ४२२ नियमित कर्मचाऱ्यांपैकी २२ जण उपस्थित होते. संपाच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया उरकल्या. यानंतरही गुरुवारी घाटीत १७ शस्त्रक्रिया, १३ प्रसुती, आठ सिझर करण्यात आले. सात शवविच्छेदन करण्यात आले. बाह्यरुग्ण विभागात ८११ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ४५८ स्टुडन्ट सिस्टरची मदत घेण्यात आली. १६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ही सर्व माहिती सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची आहे.

— डॉ. विजय कल्याणकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com