Electric Railway : ...अखेर आली इलेक्ट्रिक रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Railway test was successful

Electric Railway : ...अखेर आली इलेक्ट्रिक रेल्वे

औरंगाबाद : नुकतेच विद्युतीकरण झालेल्या  रोटेगाव ते औरंगाबाद रेल्वे मार्गावर  शुक्रवारी (ता. तीस)  ताशी १०० किलोमिटर वेगाने इलेक्ट्रिक इंजिनसह १० डब्यांची रेल्वे धावली. सिकंदराबादहून शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास डिझेल इंजिनच्या मदतीने इलेक्ट्रिक इंजिनची रेल्वे औरंगाबादला दाखल झाली.

दुपारी ही रेल्वे औरंगाबादहून पुन्हा रोटेगावला पाठवण्यात आली. यावेळी रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर तसेच अधिकारी या रेल्वेत होते. प्रत्येक ठिकाणी पाहणी करून आढावा घेत ते रोटेगाव येथे पोचले. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही रेल्वे रोटेगावहून चाचणीसाठी रवाना झाली.

रात्री आठच्या सुमारास विद्युतवर चालत रेल्वे औरंगाबादेत दाखल झाले. या रेल्वेसाठी रेल्वेस्थानकावर फुग्यांची सजावट करण्यात आली होती. रेल्वे दाखल झाल्यावर लोको पायलट आणि अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

औरंगाबाद ते रोटेगाव मार्गावरील वीजेवर रेल्वे चालण्याची चाचणी यशस्वी झाली असून यासंबंधीचा अहवाल रेल्वे प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर औरंगाबादहून विजेवर नियमित रेल्वेगाड्या धावतील, अशी अपेक्षा आहे.

रोटेगाव रेल्वेस्थानकावर विद्युतीकरणाच्या तपासणीच्या पहिल्या दिवशी मुख्य लोको पायलट राजकुमार रोहित कुमार, सहाय्यक पायलट विनोद पवार, सतीश सपाटे यांचा मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे शाल देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच लोको इन्स्पेक्टर के. आय. चड्डा, व्ही. एन. सेठी, प्रेमसिंग विस्ट यांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे उपाध्यक्ष दामोदर पारिक आदींसह स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे, चीफ लोको निरीक्षक प्रेमसिंग, जी. व्ही. गोरे आदींची उपस्थिती होती.