शाकुंतल स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचतीबाबत जागृती
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १६ : गणेशोत्सव आणि अभियंता दिनाचे औचित्य साधून शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स येथे महावितरणच्या नांदेड विभागातर्फे विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचत, हरित ऊर्जा आणि ऊर्जा साक्षरतेबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीतील ४७० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता अमोल राखे यांनी विद्यार्थ्यांना विजेचा सुरक्षित वापर, विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, विद्युत अपघातांपासून बचावाचे उपाय तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. हरित ऊर्जेचे महत्त्व आणि ऊर्जा संवर्धनाची गरजही त्यांनी स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. संस्थेचे अध्यक्ष गिरीश जाधव यांनी दैनंदिन जीवनात वीज बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. शाळेचे प्राचार्य सदाशिव टाकळे यांनी विद्यार्थ्यांना वीज बचत, सुरक्षित वापर आणि ऊर्जा संवर्धनाची शपथ दिली. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष दीपक जाधव, सचिव सिंधु जाधव, कोषाध्यक्ष पूजा जाधव, सहसचिव शिवकुमार बुक्के, उपप्राचार्य भुवना बार्शीकर, सतीश येमलवाड, मारोती मोरे, राजकुमार गच्चे, संभाजी पल्लेवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘वीज सुरक्षितपणे वापरा, वीज वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.