
Aurangabad : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अंधाराचा फायदा घेत लुटले
औरंगाबाद : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ठार मारण्याची धमकी देऊन आयफोन आणि सोनसाखळी हिसकावून लुटमार करणाऱ्या गुन्हेगाराला मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई १५ सप्टेबररोजी रेल्वे गेट क्रं ५६ जवळ करण्यात आली. वैभव बाळासाहेब शिंदे (२२, रा. महालक्ष्मी कॉलनी, एन-२, ठाकरे नगर) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.
मूळचा परभणी येथील सिद्धेश चंद्रकांत डिटी (रा. भोईवाडा) हा शहरात शिक्षण घेत आहे. १४ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी भागातील तुकोबानगर येथील महापालिकेच्या शाळेच्या मैदानावरून जात असताना रात्री आठच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन वैभव याने त्याला अडविले.
जीवे मारण्याची धमकी देत सिद्धेश याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि आयफोन हिसकावून धूम ठोकली. सिद्धेश याने घाबरून स्वतःच्या रूमवर गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली कि, रेल्वे गेट क्र ५६ येथील एका टपरीवर आयफोन आणि सोनसाखळी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत आयफोन आणि सोनसाखळी मिळून आली. त्याला अटक करून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आरोपीची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली.