दहावी-बारावी परीक्षेत यंदा ‘होम सेंटर’ नाही
---
झोन पद्धतीने केंद्रांची पुनर्रचना; जिल्हा परिषदेच्या ४५ शाळांत केंद्रे सुरू करण्याचे नियोजन
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १६ : दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांच्या रचनेत बदल करण्यात येणार आहे. जवळच्या शाळांचे झोन तयार करून त्यानुसार केंद्रे निश्चित केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना यंदा नेहमीप्रमाणे ‘होम सेंटर’ मिळण्याची शक्यता संपुष्टात आली. मात्र, दुर्गम भागात पर्यायी केंद्र उपलब्ध नसलेल्या ठिकाणीच अपवादात्मक परिस्थितीत गृहकेंद्र ठेवण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. केंद्रांची संख्या कमी करून कॉपीच्या प्रकारांना आळा घालणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी ही माहिती दिली. यंदा जिल्हा परिषदेच्या सुमारे ४५ शाळा दहावीची परीक्षा केंद्रे म्हणून निश्चित करण्याचे नियोजन आहे. उपलब्ध खोल्या, विद्यार्थ्यांची संख्या आणि आवश्यक सुविधांचा विचार करूनच केंद्रे ठरवली जातील. एका परीक्षा हॉलमध्ये २५ विद्यार्थ्यांना बसविण्याच्या निकषामुळे पुरेशा खोल्या नसलेल्या शाळांना केंद्र देताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अधिक विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता आणि आवश्यक सुविधा असलेल्या शाळांना प्राधान्य दिले जाणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यात बारावीसाठी १६७, तर दहावीसाठी २३४ परीक्षा केंद्रे होती. यंदा झोन पद्धतीमुळे जवळची चार-पाच केंद्रे एकत्रित करून मोठ्या केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे केंद्रांची संख्या कमी होईलच, शिवाय परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवणे आणि भरारी पथकांच्या माध्यमातून देखरेख करणे सोपे होईल.
---
दोन केंद्रे कायमस्वरूपी बंद
मागील परीक्षांमध्ये कॉपीचे प्रकार आढळलेल्या बारावीच्या ७ आणि दहावीच्या ५ केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. यातील चापानेर आणि जैतापूर येथील दोन केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचे लाठकर यांनी सांगितले. तसेच, इतर काही केंद्रांवर एक-दोन वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांची अंतिम यादी आणि झोनची रचना करण्याचे काम सध्या मंडळाकडून सुरू आहे.
---
दुष्काळामुळे परीक्षा शुल्क खात्यात परत
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. मात्र, शासन निर्णय जारी होण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरले होते, त्यांची ती रक्कम परत केली जाणार आहे. शासनाच्या नियोजनानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाईल. त्यामुळे अगोदर शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांनाही शुल्कमाफीचा लाभ मिळणार असल्याचे लाठकर यांनी स्पष्ट केले.
---
(((कोट)))
झोन पद्धत पूर्वीपासून शहरांमध्ये राबवली जात आहे. मात्र, आता ग्रामीण भागातही जिथे एकपेक्षा अधिक केंद्रे आहेत, अशा तालुक्याच्या किंवा मोठ्या गावांच्या ठिकाणी झोन तयार केले जातील. यामुळे पूर्वी ज्या प्रमाणात होम सेंटर मिळत असत, त्यात आता मोठी घट होईल.
- रवींद्र वाणी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ