Chhatrapati Sambhajinagar News : बनावट पदव्यांचा गोरखधंदा उघड; या संस्थांचा करत होते वापर...

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका प्रकरणाचा झाला पर्दाफाश.
crime
Crimesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयात बोगस प्रवेश घेत शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून एकाने खुलताबादच्या कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षक पद मिळविले.

खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मराठी व मानसशास्त्र विषयाच्या अंशतः अनुदानित सहशिक्षकपदावर शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोइजुद्दीन यांची २३ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्ती झाली.

स्थानिक निवड समितीने एका दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ५ ऑक्टोबर २०२४ ला विभागीय शिक्षण संचालक कार्यालयाकडे मान्यता प्रस्ताव पाठवला. मात्र, नियुक्तीसाठी सादर केलेली शैक्षणिक कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.

शेख मोहम्मद हफीझ यांनी २०१६-१७ मध्ये विवेकानंद महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्याचे दाखवले आणि २०१८-१९ मध्ये तृतीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला. तथापि, महाविद्यालयाच्या नोंदणीत त्यांचा कुठलाही प्रवेश नसल्याचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांनी स्पष्ट केले. तसेच, शिवाजी विद्यापीठानेही त्यांच्या सर्व पदव्यांची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे जाहीर केले आहे.

माहितीच्या अधिकारांतर्गत पोलखोल

रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत शेख मोहम्मद हफीझ यांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी केली असता हा घोटाळा उघडकीस आला. १७ मार्चला विवेकानंद महाविद्यालयाशी पत्रव्यवहार करून तपासणी केली असता, शेख मोहम्मद हफीझ यांचा या महाविद्यालयाशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

ही बाब उघडकीस येण्याच्या आधीच २२ मार्चला कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान यांनी कोणतेही कारण न देता शेख मोहम्मद हफीझ यांची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र दिले. विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे खुलासा मागवण्यापूर्वीच ही कारवाई केल्याने या महाविद्यालयाने काही लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणासंदर्भात बुधवारी संघटनांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे. तसेच कोहिनूर संस्थेने संबंधित सहशिक्षकाची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले आहे. मात्र, अचानकपणे नियुक्ती रद्द केल्याच्या कारणाचा देखील संस्थेकडून खुलासा मागवण्यात येणार आहे. परंतु अद्याप कार्यालयाकडे शिवाजी विद्यापीठाचे पत्र प्राप्त झालेले नाही. पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

- प्रकाश मुकूंद, शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर

शिक्षण क्षेत्रात बनावट पदव्यांचे वाढते प्रकरण

ही घटना म्हणजे बनावट पदव्यांच्या रॅकेटचा फक्त एक भाग असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारे उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिष्ठेवर आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपाइंचे (आठवले) जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com