नामांकित ब्रँडच्या नावाने
बनावट साबणांची विक्री
-----
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : बाजारातील नामांकित कंपन्यांच्या ब्रँडशी मिळतेजुळते लेबल्स लावून बनावट कपड्यांच्या साबणाची साठवणूक व विक्री करणाऱ्या रॅकेटचा जिन्सी पोलिसांनी पर्दाफाश केला. कारवाईत तीन लाख ५३ हजार १२० रुपयांचे अडिच हजार साबणांचे बनावट खोके जप्त करण्यात आले. या प्रकरणी पैठण तालुक्यातील वडगाव येथील पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
याप्रकरणी व्यावसायिक रणजित पंडितराव थोरात (वय ५८, रा. बन्सीलालनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रार दिली. त्यांच्या कंपनीच्या सोना, गोपी व गीता साबणांच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कशी हुबेहूब मिळणारे बनावट लेबल तयार करून आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी फसवणूक सुरू केली होती. संशयित आरोपी अशोक भीमराज काळे व त्याचा मुलगा सुनील अशोक काळे (दोघे रा. वडगाव, ता. पैठण) यांनी संगनमत करून स्वरूप इंडस्ट्रीज, वडगाव या नावाने बनावट गायत्री १० वड्या व इतर आकारांचे लेबल्स चिटकवून साबणांची साठवणूक केली होती. रोशनगेट परिसरातील लतीफ किराणा दुकानाजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी वेगवेगळ्या आकाराचे हजारो साबणाचे बॉक्स, छपाईचे लाकडी व पितळी स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात २ हजार ५०७ वेगवेगळ्या ९ प्रकारच्या साबणांचे बॉक्सचा समावेश असून याप्रकरणी पिता पुत्रांवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.