कर्ज नाकारल्यामुळे
शेतकरी आर्थिक कोंडीत
बँकांच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी
धाराशिव, ता. ४ (बातमीदार) : खरीप हंगामात पावसाने फिरवलेली पाठ आणि त्यामुळे झालेल्या नापिकीच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता सिबिल स्कोअरची नवी अडचण उभी राहिल्याच्या तक्रारी आहेत. ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्या तोंडावर सिबिल स्कोअरचे कारण देत बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा उडीद, मूग आणि सोयाबीन यासारखी नगदी पिके पावसाअभावी मोठ्या प्रमाणात वाया गेली. पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दरवर्षी खरीप हंगामातील उत्पन्नातून रब्बीच्या बियाणे, खतांसह अन्य निविष्ठांसाठी तरतूद केली जाते. मात्र, यंदा हातात उत्पन्न नसल्याने रब्बीची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
शेतकऱ्यांना पीककर्ज देताना सिबिल स्कोअरची अट आडवी येणार नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात बँकेत कर्जासाठी गेल्यानंतर सिबिल स्कोअर कमी असल्याचे कारण देत परत पाठविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बँकांच्या कर्जवाटपाच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, खानापूर (ता. धाराशिव) येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी (ता. एक) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कर्जासाठी बँकांचे हेलपाटे मारूनही कर्ज मिळाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे नातेवाईक व उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्याचा मृतदेह नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता. यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी सिबिलच्या कारणामुळे कर्ज नाकारले जात असल्याची कैफियत मांडली.
रब्बीची पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बँकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे. सरकारनेही या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी ठोस मार्ग काढावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.