जिल्ह्यात एक हजार ४१ कोटींवर कर्जमाफी
----------------------------------
- एक लाख १३ हजार
शेतकऱ्यांना दिलासा
-------
- चौथ्या यादीत ३४ हजार
७५४ जणांना लाभ
-----
-शेतकऱ्यांच्या खात्यावर
३६८.८४ कोटी रुपये जमा
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता.६ ः राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या चौथ्या यादीतील ३४ हजार ७५४ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ३६८ कोटी ८४ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत चार टप्प्यांत जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ९७२ शेतकऱ्यांना एकूण एक हजार ४१ कोटी ७५ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाने दोन जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरीत झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे व पुनर्गठित कर्जांपैकी पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर जिल्ह्यातील बँकांनी एकूण एक लाख ६० हजार ७६९ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली होती. या माहितीच्या संगणकीय प्रक्रियेनंतर एक लाख ३६ हजार ८०९ पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी चार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यापूर्वीच्या तीन याद्यांमधील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ७९ हजार २१८ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६७२ कोटी ९१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ३४ हजार ७५४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३६८ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्ट २०२६ रोजी सात हजार ८७० शेतकऱ्यांना ६० कोटी चार लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात २४ ऑगस्ट रोजी ४४ हजार ७१३ शेतकऱ्यांना ३४८ कोटी दोन लाख रुपये, तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर रोजी २६ हजार ६३५ शेतकऱ्यांना २६४ कोटी ८५ लाख रुपये, तर चौथ्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी ३४ हजार ७५४ शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे
----------------
((कोट)))
जिल्ह्यात आतापर्यंत चारही टप्प्यांत मिळून एक लाख १३ हजार ९७२ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एक हजार ४१ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
-विकास जगदाळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)
---------