विजयाचा गुलाल उधळण्यापूर्वीच
शेतकरीपुत्रांसाठी धावले आमदार
पदवीधरांसाठी दरमहा ४ हजार मदतीची विभागीय आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २९ : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते पहाटे विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच थेट विभागीय आयुक्त कार्यालय गाठून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरीपुत्रांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणला. मराठवाड्यातील दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांतील एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपये विशेष आर्थिक सहाय्य देण्याबाबतचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केले.
मराठवाड्यात यंदा सोयाबीनसह खरीप पिकांचे झालेली मोठी हानी आणि रब्बी हंगामाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी काहीही आलेले नाही. अशा स्थितीत विविध शहरांत राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खोलीचे भाडे, भोजन, अभ्यासिका, पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्च भागवताना पालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांतील पात्र पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, पुणे व इतर शहरांत राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी हातभार लावावा, शेतकरीपुत्रांचे भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून शासन स्तरावर तातडीने विशेष योजना सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.