एफडीए पुन्हा ‘अॅक्शन मोड’वर

एफडीए पुन्हा ‘अॅक्शन मोड’वर
Published on: 
‘एफडीए’ पुन्हा ॲक्शन मोडवर! ----- - येरमाळ्यात भेसळयुक्त खवा जप्त, जिल्ह्यातील सहा आस्थापनांचे परवाने निलंबित - नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेकरी, हॉटेल्स अन् दूध संकलन केंद्रांवर कारवाई -------- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३ : नवरात्र महोत्सव आणि आगामी सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना शुद्ध व दर्जात्मक अन्नपदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर चाबूक चालवत एफडीएने जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत येरमाळा येथे दोन व्यापाऱ्यांवर छापा मारून तब्बल ३२५ किलो संशयित भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील हॉटेल, बेकरी व दूध संकलन केंद्रांचे तब्बल सहा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. सणासुदीत मिठाई तयार करण्यासाठी खव्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा फायदा घेत भेसळयुक्त खवा विक्रीची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने येरमाळा येथे गुप्त माहितीआधारे कारवाई केली. पहिल्या विक्रेत्याकडून २०० किलो संशयित खवा ताब्यात घेण्यात आला, तर दुसऱ्या विक्रेत्याकडून १२५ किलो संशयित खवा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या या एकूण ३२५ किलो खव्याची किंमत सुमारे ७४ हजार रुपये आहे. या सर्व खव्याच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात आली असून, अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ---- अस्वच्छता व नियमांचे उल्लंघन फक्त खवाच नव्हे, तर जिल्ह्यातील विविध उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचीही कसून पाहणी केली जात आहे. तुळजापूर येथे एका हॉटेलची पाहणी केली असता, तेथे अत्यंत अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्याचा परवाना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आला. भूम तालुक्यात चार व धाराशिव शहरात एक अशा एकूण सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये हॉटेल्स, बेकरी आणि दूध संकलन केंद्रांचा समावेश आहे. ---- ((चौकट)) व्यावसायिकांचे धाबे दणाणले अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या या धडक सत्रामुळे जिल्ह्यातील भेसळखोर व्यावसायिक, हॉटेलचालक आणि मिठाई विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. एफडीएचे पथक कधीही आणि कुठेही धाड टाकू शकते, या भीतीने अस्वच्छ आणि नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. कारवाईच्या धसक्याने अनेक हॉटेलचालकांनी घाईघाईने स्वच्छता आणि दर्जा सुधारण्यास सुरवात केली आहे. एफडीएच्या या आक्रमक भूमिकेमुळे मात्र सामान्य ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com