esakal | खुलताबाद तालुक्यातील वेरुळमध्ये भरदिवसा पाच लाख लुटले,आरोप फरार
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा

खुलताबाद तालुक्यातील वेरुळमध्ये भरदिवसा पाच लाख लुटले,आरोप फरार

sakal_logo
By
देवदत्त कोठारे

खुलताबाद (जि.औरंगाबाद) : पंपावरील व्यवस्थापकाला मारहाण करुन वेरुळ (Ellore) येथील उड्डाणपुलाखाली भर दिवसा ५ लाख लुटल्याची घटना सोमवारी (ता.१९) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरु केला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. तर दुसऱ्या घटनेत वेरूळ येथील एक घर फोडून चोरट्यांनी रोख ३५ हजार रुपये लांबविल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी खुलताबाद ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, वेरूळ येथे विजय बोडके यांच्या मालकीचे जय श्रीराम पेट्रोल पंप आहे. या पंपावरील व्यवस्थापक अशोक काकडे (रा.झोलेगाव) हे सोमवारी (ता.१९)दुपारी २ वाजता ५ लाख ३४ हजार रुपये बँकेमध्ये भरण्यासाठी जात असताना वेरूळ येथील उड्डाणपुलाखाली दोन अज्ञात आरोपींनी काकडे यांच्या दुचाकीस लाथ मारून खाली पाडले व मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. (five lakh looted in khultabad tahsil of aurangabad glp 88)

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

या घटनेत काकडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच खुलताबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी पोलिस उपनिरीक्षक वाघ, वाल्मिक कांबळे, रमेश छत्रे, मनोहर पुंगळे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी श्वान पथकाचे नासेर पठाण, विलास तळेकर, ठसे तज्ज्ञ सतीश साबदे, कृष्णा चव्हाण, दिलीप चंदसे, ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. रात्री (Aurangabad) उशिरापर्यंत या घटनेतील आरोपही हाती लागले नव्हते. दरम्यान दुसऱ्या घटनेत वेरुळ (ता.खुलताबाद) येथे सोमवारी (ता.१९) रात्री चोरट्यांनी एकनाथ चव्हाण यांचे घर फोडून रोख ३५ हजार लांबविले. चव्हाण हे वेरुळ येथे चहा नाष्ट्याचे हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या व्यवसायातून बचत करीत त्यांनी ही रक्कम साठविली होती. मात्र, हीच रक्कम चोरट्यांनी लांबविल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खुलताबाद (Khultabad) पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

loading image