Traffic Rule : ट्रिपलसीटचा मोह टाळा अन् कुटुंबाला सावरा

दुचाकी अपघाताची शक्यता : पोलिसांचा काणाडोळा, दुचाकीस्वारांच्या विरोधात कारवाईची मागणी
traffic rule
traffic rulesakal

छत्रपती संभाजीनगर : शहरात तरुणाईमध्ये बिनधास्तपणे ट्रीपलशीट दुचाकी चालवण्याचे नविन फॅड सुरु झाले आहे. चौकचौकातून पोलिसांच्या नजरा चुकवून तरुण सुसाट वेगात ट्रिपलशीट जाताना दिसत आहेत. ट्रिपलशीट दुचाकी चालवल्याने तोल जाऊन अपघाताची शक्यता अनेक पटीने वाढते आहे.

अशा ट्रिपलशीट दुचाकीच्या अपघातात मृत्यू ओढावला तर विमा कंपनी क्लेम नाकारते, परिणामी कुटुंब उद्ध्वस्त होण्याचीही वेळ येवू शकते. चार दिवसापूर्वी चिकलठाणा येथे तीन तरुणांची दुचाकी ट्रकखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला. अशा घटना वारंवार होत असतानाही शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईकडे काणाडोळा केला असून ट्रिपलशीट दुचाकीस्वारांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये ट्रिपलशीट दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी गल्लीबोळातून किंवा अंतर्गत रस्त्यावरून ट्रीपलशीट दुचाकी चालविली जात होती. आता मात्र, शहरातील मुख्य रस्त्यांवरून चौकाचौकात पोलिस असतानाही पोलिसांचा अंदाज घेऊन बिनधास्तपणे ट्रिपलशीट दुचाकी चालवली जात असल्याचे चित्र आहे.

काय होतो परिणाम

दुचाकी ही दोन प्रवाशांसाठी डिझाईन केलेली आहे. त्यामुळेच दुचाकीवरून ट्रिपलशीट हे धोकादायक आहे. ट्रिपलशीट दुचाकी चालवताना वारंवार झोक जातो, अनेक वेळा ब्रेक कमी लागते किंवा ब्रेक फेल होण्याचा धोका असतो. अनेक दुचाकीचे शीट आखूड असते त्यामुळे त्यावर ट्रिपलशीट बसतानाच अडचण होते, परिणामी दुचाकीच्या हॅण्डलवर ताण येऊन दुचाकी अनबॅलेन्स होऊन अपघाताचे प्रमाण वाढते. म्हणूनच गेल्या काही वर्षापासून सातत्याने ट्रिपलसीट दुचाकीस्वारांचे अनेक अपघात झालेले आहेत.

काय होऊ शकते

ट्रिपलशीट दुचाकी चालवणे हे मोटार वाहन कायद्याच्या विरोधात आहे. कलम १२९, १९४ (क) अन्वये ट्रिपलशीट दुचाकी चालवणाऱ्याला तीन महिने शिक्षेसह एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंड सहज भरुन मोकळे होता येईल. मात्र, ट्रिपलशीट दुचाकीचा अपघात झाला तर उद्ध्वस्त होण्याची वेळ येवू शकते.

कारण ट्रिपलशीट अपघातात मृत्यू ओढावला तर विमा कंपनी क्लेम देत नाही. दुचाकीवरून ट्रिपलशीट प्रवास करणे हे कायदेशीर नाही. त्यामुळेच अशा अपघातात विमा कंपनी मृत्यूची नुकसानभरपाई (जी हजारांपासून ते लाखोंमध्ये असते), याशिवाय स्वतःच्या वाहनाचे किंवा थर्ड पार्टी म्हणजे दुसऱ्याच्या वाहनाची अथवा तुमच्या दुचाकीने समोरच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचाही असा कुठलाही नुकसानीचा क्लेम देत नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अपघात न्यायाधिकरणात अनेक खटले प्रलंबीत आहेत.

ठळक मुद्दे

  • ट्रिपलशीट दुचाकी चालवल्याने अपघाताची शक्यता वाढते.

  • ट्रिपलशीट दुचाकी चालवणे बेकायदेशीर आहे.

  • ट्रिपलशीट दुचाकीच्या अपघातानंतर कायदेशीर अडचणी निर्माण होतात.

  • ट्रिपलशीट दुचाकी अपघातातील नुकसान भरपाई मिळत नाही.

  • लाखोंचे विमा दावे वाहन मालकाच्या अंगावर पडतात.

मोटर वाहन कायद्याप्रमाणे दुचाकी ही केवळ दोन व्यक्तीसाठी वैध आहे. त्यामुळे ट्रिपलशीट दुचाकीचा अपघात होऊन मृत्युसारखी घटना घडली तर विमा पॉलिसीचे उल्लंघन ठरते. त्यामुळे विमा कंपनी कुठलीही नुकसान भरपाई देत नाही. अशा प्रकरणात न्यायालयातूनही दिलासा मिळेल ही शक्यता कमी होते. त्यामुळेच मोठा अपघात झाला तर कुटुंब उद्ध्वस्त होवू शकते.

— ॲड. कल्पेश गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com