G20 Summit : विदेशी पाहुण्या नेसल्या नऊवारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foreign guests wearing nauvari saree marathi tradition

G20 Summit : विदेशी पाहुण्या नेसल्या नऊवारी!

छत्रपती संभाजीनगर : जी- २० निमित्त शहरात आलेल्या विदेशी महिला पाहुण्यांनी सोमवारी (ता.२७) आयोजित डब्ल्यू -२० परिषदेत मराठमोळ्या साडी नेसून उत्साहाने सहभाग घेतला. शहरात आयोजित जी -२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात विविध खाद्यपदार्थ व हस्तकलेच्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी (ता.२७) पंचतारांकित हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये झालेल्या परिषदेला डब्ल्यू-२०च्या विदेशी महिलांनी राज्यातील ओळख असलेली साडी नेसून सहभागी झाल्या.

यात यूएसएतील मिशेलिन शिवलर्थोर्व यांनी नऊवारी साडी नेसून परिषदेला सहभागी झाली. तसेच या प्रदर्शनामध्ये नऊवारी नेसलेला एका पुतळा ठेवण्यात आला आहे. या पुतळ्याला पाहून विदेशी महिलांना नऊवारीची भुरळ पडली आणि त्यांनी ही नऊवारी नेसून बघितली व तशाच त्या परिषदेत सहभागी झाल्या.

दरम्यान महिला बचत गटाच्या प्रदर्शनात २५ नऊवारी, पैठणी साड्या व बांगड्या ट्रायलसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आलेल्या बहुतांश महिला पाहुण्यांनी हातावर मेहंदी काढून घेतलेली आहे. यात देवगिरी महाविद्यायातील विद्यार्थिनी फातेमा जुलाला हिने तुर्कीच्या कुडसिया कलबर्गी या विदेशी महिलेच्या हातावर मेहंदी काढली.

मॉलसारखी व्यवस्था

या प्रदर्शनात विविध खाद्यपदार्थ व हस्तकलेच्या वस्तू आहेत. सर्व खाद्यपदार्थांची तपासणी प्रयोगशाळेतून करण्यात आलेली आहे. या वस्तूंना आकर्षक अशी पॅकिंग करण्यात आली असून त्याला एक बारकोड ठेवण्यात आलेला आहे,

हा बारकोड स्कॅन करताच वस्तू व पदार्थसंदर्भात सर्व माहिती मिळते व तसेच वस्तू खरेदी केल्यानंतर एक वेगळे कॅश काऊंटर ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी बीसी सखी व एसबीआयचे पॉज मशीन ठेवण्यात आले आहे, अशी मोठ्या मॉलसारखी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Aurangabad News