Gas Tanker Accident Sambhaji Nagar : तहानभूक विसरून धावले शेकडो अधिकारी, कर्मचारी ; हजारोंचे प्राण वाचले,अग्निशमन विभागाच्या ९१ जवानांनी १२ तास केला पाण्याचा मारा

नागरी सुविधांच्या कारणांवरून एरव्ही टीकेचे धनी ठरणारे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी गुरुवारी (ता.एक) गॅस गळतीच्या घटनेनंतर सिडको परिसरातील हजारो नागरिकांच्या जिवाचा धोका टाळण्यासाठी तहानभूक विसरून कामाला लागले. प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन व संपूर्ण महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी ठाण मांडून होती.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : नागरी सुविधांच्या कारणांवरून एरव्ही टीकेचे धनी ठरणारे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी गुरुवारी (ता.एक) गॅस गळतीच्या घटनेनंतर सिडको परिसरातील हजारो नागरिकांच्या जिवाचा धोका टाळण्यासाठी तहानभूक विसरून कामाला लागले. प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन व संपूर्ण महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी ठाण मांडून होती. अग्निशमनचे ९१ जवान न थकता सुमारे १२ तास अपघातग्रस्त टॅंकरवर पाण्याचा मारा करत होते. अनुचित प्रकार घडलाच तर नागरिकांना तातडीने आरोग्यसेवा देण्यासाठी तीन ॲम्ब्युलन्ससह ५० जणांची आरोग्य विभागाची टीम तैनात करण्यात आली होती.

सिडको चौकात गॅसचा टॅंकर उलटून गळती होती असल्याचा फोन येताच शिवाजी झनझन साडेपाचच्या सुमारास धावतपळत सिडको चौकात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी प्रशासक जी. श्रीकांत यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ब्रिगेड कॉल केला. त्यामुळे सिडको, पदमपुरा, चिकलठाणा येथील पाचही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. टॅंकरमधून मोठ्याप्रमाणावर गॅस गळती होत असल्याने आग भडकण्याचा धोका होता. त्यावर टॅंकरद्वारे पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. सकाळी ६.३० वाजता पाण्याचा मारा करण्यासाठी उभे राहिलेले अग्निशमन विभागाचे कर्मचारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत न थकता पाण्याचा मारा करत होते. तहान, भूक विसरून न थांबता, जिवाची पर्वा न करता या जवानांनी धैर्याने काम केले. शिवाजी झनझन त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते उभे होते.

दरम्यान अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख स्वप्नील सरदार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांच्यासह इतर अधिकारी दाखल झाले. सव्वादहा वाजता प्रशासक जी. श्रीकांत देखील घटनास्थळी आले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना एकत्र करत आढावा घेतला. कमीत कमी धोका पत्करून उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सायंकाळी अपघातग्रस्त टॅंकर घटनास्थळावरून जाईपर्यंत जी. श्रीकांत ठाण मांडून होते. प्रसिद्धिमाध्यमांना क्षणाक्षणाचे अपडेट त्यांनी दिले.

अख्खा एन-३ परिसर रिकामा

गॅस टँकरला अपघात झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण एन-३ परिसर रिकामा करायला सांगितला. सकाळपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. नागरिकांना गॅस पेटवण्यास मनाई असल्याने नागरिक घाबरून गेले होते. सुरवातीला पोलिसांनी नागरिकांना फक्त सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या. दीड तासांपूर्वी मात्र एन -३ परिसर रिकामा करण्यास सांगितल्याने नागरिक घाबरून गेले. संपूर्ण परिसरात गॅस पसरल्याने काही ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना त्रास झाला. संत मीराबाई शाळेत नागरिकांना बसण्याची व्यवस्था असली तरीही नागरिकांनी एन-३ मधून बाहेर पडण्यास प्राधान्य दिले. मात्र, इथून बाहेर पडण्याच्या सर्व मार्गावर वाहतूक खोळंबा झाला. १०० मीटर अंतर पार करण्यासाठी नागरिकांना ४० मिनिटे लागली, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

साडेबाराशे सिलींडर भरतील एवढा टॅंकरमध्ये होता गॅस

टँकरला अपघातानंतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुर्दैवाने हा अपघात झाला असता तर या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर असती की आपत्ती व्यवस्थापन पुरते कोलमडले असते. तेल कंपन्या घरगुती ग्राहकांना १४.२ किलो इतका एलपीजी गॅस सिलिंडर देते. जालना रस्त्यावर दुर्घटनाग्रस्त टँकरमध्ये १८ टन गॅस होता. याचा अर्थ या टँकरमध्ये जवळपास १,२८५ गॅस सिलेंडर इतका गॅस होता. ही घटना आटोक्यात आली म्हणून अन्यथा एकाचवेळी इतक्या गॅस सिलेंडरचा एकाच वेळी स्फोट झाल्यावर जे घडू शकत होते ते घडले असते!

sambhaji nagar
Sambhaji Nagar : अहवालाचा शिक्षण विभागावर ‘असर’ ; पर्यवेक्षण यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना,शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी

खंडपीठात न्यायमुर्तींची तत्परता

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती देण्यात आली. त्यावेळी गॅस टॅंकरच्या अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून खंडपीठाचे प्रशासकीय न्या. रवींद्र घुगे यांनी खंडपीठाची इमारात रिकामी व्हावी म्हणून पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः खंडपीठातील सर्व न्यायमूर्तींना माहिती दिली. वकिलांची भेट घेत प्रत्येक पक्षकारांना निरोप देण्याचे सांगीतले. एवढेच नव्हे तर न्यायालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सफाई कर्मचारी या सर्वांची भेट घेत घरी जाण्याचे आवाहन केले. काही वेळाने बरेच वकिल कॅन्टीनमध्ये जावून बसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा कॅन्टीनमध्ये जावून वकिलांना घटनेचे गांभीर्य आणून देत खंडपीठातून जाण्याच्या सुचना केल्या.

खबरदारीसाठी ७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाने माहिती देताच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रभावित भागात वीजपुरवठा खंडित केला. परिसरातील सर्व वसाहतींमध्ये सुमारे सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवला गेला. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हातभार लावल्याबद्दल खुद्द महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

६० टक्क्यांपर्यंत हवेत होता गॅस

सकाळच्या वेळी टॅंकरमधून गॅस गळती झाली. त्यामुळे परिसरातील हवेतील गॅसचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत गेले होते. हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत गेले असते तर आग भडकण्याची शक्यता होती. मात्र पाण्याचा मारा केल्यामुळे हळूहळू हे प्रमाण कमी झाले व ते १२ टक्क्यांपर्यंत आले, त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला.

सर्व नागरिकांचे आभार

गॅस टॅंकर दुर्घटनेच्या अनुषंगाने आम्ही सर्वच अधिकारी पहाटेपासून घटनास्थळी तळ ठोकून होतो. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमामुळे मोठ्या दुर्घटनेतून आपण सर्व शहरवासीय सावरलो आहोत. सातत्याने गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या आणि टेक्निकल टीमच्या संपर्कात राहून ही मोहीम फत्ते केली. नागरिकांनीही अत्यंत संयम राखून प्रशासनाला मदत केली, त्यामुळे हे शक्य झाले.

— जी. श्रीकांत, प्रशासक, महापालिका

संपूर्ण परिसर केला खाली

अपघाताच्या माहितीनंतर संपूर्ण पोलिस यंत्रणा तत्पर केली. सर्व पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना सतर्क केले. दुर्घटना मोठी होऊ शकते म्हणूनच सर्वप्रथम परिसरातील इमारती खाली करून घेतल्या. परिसरातील हॉटेल्स, रुग्णालये आणि रहिवाशांना सतर्क केल्यामुळे ऑपरेशन सहज पार पाडता आले. सातत्याने पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नागरिकांनीही पोलिस यंत्रणेला सहकार्य केले.

— मनोज लोहिया, पोलिस आयुक्त

सर्व यंत्रणा सज्ज केली

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस, महावितरण, महापालिका आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत यंत्रणा कामाला लावली. पहाटे घटना घडल्याची माहिती मिळाल्यापासून आम्ही सर्व अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होतो. कुठल्याही परिस्थितीत विपरीत घटना होऊ नये म्हणून एक किलोमीटर परिसरातील घरे, इमारतीमधील लोकांना बाहेर काढले.

— विजय चव्हाण,

अपर तहसीलदार

प्रशासकीय यंत्रणा होती सतर्क

आम्ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमशी सातत्याने संपर्क ठेवून होतो. सुरवातीला अपघातग्रस्त टॅंकरमधून गॅस दुसऱ्या रिकाम्या टॅंकरमध्ये ट्रान्स्फर करावा की, आहे त्याच परिस्थितीत पाण्याचा मारा करून असलेला गॅस संपवावा यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागला. एचपी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गॅस ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयाला आणि परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. रहिवासी परिसर रिकामा करून घेतला होता.

— डॉ. अरविंद लोखंडे, प्रभारी जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com