Chhatrapati Sambhajinagar : टॅंकरमधून चोरला चार लाखांचा गॅस; जीपीएस केले बंद, वाहन बेवारस सोडून चालक पसार

गॅस पंपाला पुरवठा करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या टॅंकरमधून जीपीएस प्रणाली बंद करीत चार लाख रुपयांच्या गॅसची चोरी केल्याची घटना वाळूज येथे उघडकीस आली.
Gas worth four lakhs stolen GPS turned off driver escaped leaving vehicle abandoned
Gas worth four lakhs stolen GPS turned off driver escaped leaving vehicle abandonedSakal

वाळूज : गॅस पंपाला पुरवठा करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या टॅंकरमधून जीपीएस प्रणाली बंद करीत चार लाख रुपयांच्या गॅसची चोरी केल्याची घटना वाळूज येथे उघडकीस आली. चालक टॅंकर बेवारस सोडून पसार झाला. याप्रकरणी फरारी टॅंकरचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, नागपूर येथील कॉन्फीडन्स पेट्रोलियम इंडिया लि.(गो-गॅस) या कंपनीकडून दुसऱ्या देशातील एलपीजी गॅस आयात करून राज्याच्या विविध जिल्ह्यांत असणाऱ्या गो-गॅस पंपावर विक्रीसाठी पुरविण्यात येतो.

२५ फेब्रुवारीरोजी रत्नागिरीतील जेएसडब्ल्यू जयगोड पोर्ट कंपनीतून चालक गोविंद सुग्रीव गुढे (रा. मालेकरी गल्ली, धर्मापुरी, जि. बीड) हा टॅंकरमध्ये (यूपी-५३, ईटी-४१२५) सुमारे २० टन ७० किलो एलपीजी गॅस भरून छत्रपती संभाजीनगरात पंपावर पुरवठ्यासाठी निघाला होता.

त्यानंतरच्या चार दिवसांनी म्हणजेच २९ फेब्रुवारीला चालक गुढे याने कांचनवाडी येथील गॅस पंपावर चार टन ६७० किलो, चिकलठाणा पंपावर सात टन ३० किलो, तर जालना येथील पंपावर तीन टन २६० किलो गॅसचा पुरवठा केला.

यानंतर जालना येथून तो दोन मार्चला मध्यरात्रीला टॅंकरमध्ये शिल्लक असलेला पाच टन ११० किलो गॅस घेऊन वाळूजच्या गॅस पंपावर पोच करण्यासाठी निघाला होता. मात्र, जालना येथून वाळूजला येत असताना झाल्टा फाट्याजवळ टॅंकरचालक गोविंद गुढे याने टॅंकरची जीपीएस सिस्टीम व स्वत:चा मोबाइल बंद केला. त्यामुळे कंपनीचे सागर पटेल यांना संशय आला.

अनेकदा फोन करूनही गुढेचा मोबाइल बंद येत असल्याने काहीतरी गडबड असल्याचे पटेल यांच्या लक्षात आले. टॅंकरसह चालक गायब झाल्याने तसेच टॅंकरची जीपीएस सिस्टीमही बंद झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. ही शोधमोहीम सुरू असताना लिंबेजळगावच्या पथकर नाक्याजवळ हा टॅंकर बेवारस अवस्थेत आढळला.

साहित्यही लंपास

टॅंकरमधील शिल्लक राहिलेला पाच टन ११० किलो गॅस गायब असल्याचे दिसून आले. शिवाय टॅंकरची स्टेपनी, एक टायर, जॅक, पाना, गॅस व साहित्यही गायब असल्याचे आढळले. एकूण चार लाख ३३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल गायब झाल्याचे कंपनीचे सहायक व्यवस्थापक सागर पटेल यांच्या तपासणीत निष्पन्न झाले.

टॅंकरचालक गोविंद गुढे याने टॅंकरमधील पाच टन गॅस कुठेतरी विक्री करून व टॅंकरमधील साहित्य चोरी करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापक पटेल यांनी वाळूज पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुढेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सखाराम दिलवाले हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com