Georai Farmer Saves 10,200 Fruit Trees Amid Drought
esakal
सुभाष सुतार
गेवराई,: पावसाने डोळे वटारले की काळजात धस्स होतं. स्वतःच्या लेकरासारखी वाढवलेली झाडं जेव्हा पाण्यावाचून माना टाकू लागतात, तेव्हा तो वेदनांचा घोट गिळणं सोपं नसतं. पण आम्ही निसर्गाला दोष देत रडत बसलो नाही. संकट आलं, तेव्हा आम्ही घामाचे तळे साचवून ही लढाई जिंकली... हे बोलताना गेवराईचे शेतकरी रामनाथ दाभाडे यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. एकीकडे गेल्या चार महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शिवारे करपून गेली आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, याच भीषण दुष्काळात रामनाथराव दाभाडे यांच्या २२ एकरांतील दहा हजारांहून अधिक फळझाडे हिरवीगार डोलत आहेत. हे केवळ नशीब नाही, तर नऊ वर्षांपूर्वी केलेल्या नाला खोलीकरणाच्या आणि पाण्याच्या सूक्ष्म नियोजनाच्या कष्टाचे फळ आहे.
रामनाथराव दाभाडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे गेवराई शहराजवळ २५ एकर शेतजमीन आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी यातील तब्बल २२ एकर जमिनीवर फळबाग फुलवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या बागेत आज सीताफळ, मोसंबी, नारळ, आंबा, चिकू, चिंच, सफरचंद आणि जांभळाची तब्बल दहा हजार दोनशे झाडे उभी आहेत. २०१८ साली त्यांनी केवळ सीताफळाची ७ हजार झाडे लावली