इतना सन्नाटा क्यूं है भाई...! शहरातल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, आणखी पंधरा दिवस मोहीम सुरू राहणार, एकाच वेळी लसीकरण व नसबंदी

इतना सन्नाटा क्यूं है भाई...!   शहरातल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, आणखी पंधरा दिवस मोहीम सुरू राहणार, एकाच वेळी लसीकरण व नसबंदी
Published on: 
श्वान पकडण्याची मोहीम वेगात वाढत्या दहशतीनंतर गेवराई पालिकेला जाग, कुत्र्यांच्या दहशतीतून होणार मुक्तता गेवराई, ता. १९ (बातमीदार): इतना सन्नाटा क्यूं है भाई...! असा प्रश्न सध्या गेवराई शहरातील नागरिकांना पडत आहे. कारण, एरवी गल्लीबोळात उच्छाद मांडणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या अचानक दिसेनाशा झाल्या आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून, मागे-पुढे बघत चालावे लागत होते. मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेऊन जखमी केल्याने लोक या दहशतीमुळे प्रचंड हैराण झाले होते. अखेर या गंभीर समस्येची दखल घेत गेवराई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत मोकाट कुत्र्यांना पकडण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शहरातील सुमारे १७५० फिरस्ती आणि पाळीव कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी व लसीकरण केले जाणार असून, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु ही मोहीस सलग चालेल का? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत होत्या. एखादा एकटा माणूस किंवा लहान मूल दिसले की हे कुत्रे चावा घेण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडत असत. मागील अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ८१९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. या भयंकर परिस्थितीमुळे मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत होती. या ज्वलंत प्रश्नावर ‘सकाळ’ने २७ ऑगस्ट रोजी गल्लीबोळात कुत्र्यांच्या टोळ्या, नागरिक त्रस्त या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत २१७ कुत्रे पकडण्यात आले आहेत. अंबाजोगाई येथील एका खासगी संस्थेच्या माध्यमातून या कुत्र्यांवर लसीकरण आणि नसबंदीची शस्त्रक्रिया केली जात आहे. शहरातील मोकाट तसेच पाळीव कुत्र्यांचाही यात समावेश असून, ही मोहीम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. ----- श्वान केंद्रावर घेतली जातेय योग्य काळजी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत कुत्रे पकडून त्यांना एका सुरक्षित स्थळी (सेंटरवर) हलवले जात आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी प्राण्यांची आबाळ होऊ न देता त्यांना दोन वेळचे जेवण, पाणी आणि दूध देऊन त्यांची काळजी घेतली जात आहे. एकाच वेळी लस व नसबंदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवस त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून त्यांना पुन्हा सोडून देण्यात येणार आहे. पालिकेने ही मोहीम राबवल्याने गल्लीबोळात सन्नाटा पसरला असून, नागरिकांमधून या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे. ----- कोट नगराध्यक्षा गीता पवार आणि मुख्याधिकारी विक्रम मांडुरगे यांच्या आदेशानुसार गेवराई शहरातील मोकाट व पाळीव कुत्रे पकडण्याची मोहीम स्वच्छता विभागाने सुरू केली आहे. फिरस्ती व पाळीव कुत्र्यांना लस देऊन त्यांची नसबंदी केली जात आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना सोडून देईपर्यंत, सेंटरवर या सर्व कुत्र्यांची अतिशय योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे. - सनी कांबळे, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद, गेवराई ------ कुत्रा चावल्यानंतर ती जखम त्वरित नळाच्या वाहत्या पाण्याखाली साबणाने फेस येईपर्यंत स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर वेळ न घालवता जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष करणे अतिशय धोकादायक असू शकते. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात टीटी, अँटी-रेबीज लस आणि अँटी-रेबीज सिरम या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांचा सतत पाळीव प्राण्यांशी संपर्क येतो, अशा नागरिकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. - डॉ. विजयकुमार कट्टे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई ------ फोटो ओळ ः स्वच्छता विभागामार्फत कुत्रे पकडून लस व नसबंदीसाठी सेंटरवर ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com