घनसावंगी तालुक्यातील बी एल ओ मानधनापासून वंचित निधी प्राप्त होऊनही तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा; जुनी पेन्शन संघटनेचा आरोप

घनसावंगी तालुक्यातील बी एल ओ मानधनापासून वंचित निधी प्राप्त होऊनही तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा; जुनी पेन्शन संघटनेचा आरोप
Published on: 
घनसावंगी तालुक्यातील बीएलओ मानधनापासून वंचित घनसावंगी, ता. २० : घनसावंगी तालुक्यातील सर्व बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) जबाबदारीने एसआयआरचे काम तसेच वर्षभर मतदारांशी संबंधित विविध कामे पार पाडत आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून घनसावंगी तालुक्यातील सर्व बीएलओंचे (बूथ लेव्हल ऑफिसर) हक्काचे मानधन मंजूर होऊन तहसील कार्यालयात जमा झालेले असतानाही, तहसील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे मानधन अद्याप बीएलओंच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. जालना जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांतील बीएलओंचे मानधन महिनाभरापूर्वीच त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. मात्र, केवळ घनसावंगी तालुक्यातच तहसील कार्यालयाच्या कारभारामुळे मानधन रखडले आहे. वरिष्ठ स्तरावरून निधी उपलब्ध झाला असतानाही स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.निवडणुकीच्या काळात तसेच वर्षभर मतदार याद्या अद्ययावत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागणे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे घनसावंगी तहसील प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून बीएलओंचे थकीत मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी जोर धरत आहे. .... कोट... संपूर्ण जिल्ह्यात मानधन जमा झाले असताना, घनसावंगी तहसील कार्यालयाकडून मागील तीन महिन्यांपासून निधी उपलब्ध असूनही मानधन जमा केले जात नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन बीएलओंचे मानधन त्यांच्या खात्यावर वर्ग करावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. - सचिन डोके, तालुकाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना, घनसावंगी
Marathi News Esakal
www.esakal.com