Gopinath Munde Punyatithi : बीड जिल्हापरिषदेवर निवडून आले आणि पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही! मुडेंची संघर्षयात्रा..

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!
gopinath munde
gopinath mundeesakal

काळाच्या किल्ल्या कुणाच्याच हातात नाहीत! मृत्यु अटळ असून माणसाला तो कोणत्या वळणावर येऊन मिठी मारेल(?) याची अजिबात शाश्वती नाही! नियतीने कुणाच्या भाग्यात काय लिहिले आहे(?) हे कुणालाच माहित नाही, असे असले तरी इथे प्रत्येकजण आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्यासाठी धडपडतोय! याच वैश्विक न्यायाने काही माणसं आपल्या दैदिप्यमान कार्य-कर्तृत्वाने आपले जगणे-जीवन जनमानसांच्या हृदयावर आरूढ होऊन वलयांकित करतात!

दुर्दैवाने नियतीला हे पहावत नाही आणि ती माणसे अचानक कालवश होतात! त्यावर कुणाचाच विश्वास बसत नाही! याचप्रमाणे महाराष्ट्राची बुलंद तोफ, संघर्षपुत्र, जनतेच्या मनावर अहोकाल अधिराज्य गाजवणारे लोकनेते, केंद्रीय मंत्री नामदार गोपीनाथराव मुंडे आजपासून बरोबर नऊ वर्षापूर्वी एका अपघाताची शिकार होतात आणि तमाम जनतेला अश्रूंच्या महासागरात ढकलून आपण जगाचा निरोप घेतात! ही दुर्दैवी घटना वर्णन करायला शब्दकोशांत शब्दच सापडत नाहीत! नेमकं काय म्हणावं या नियतीला? तो दिवस आठवला की; आज सुद्धा काहींच सुचत नाही.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आपल्यात नाहीत हे आज सुद्धा मन मानायला तयार नाही! स्वर्गीय लिहावसं वाटत नाही! याच वेड्या मायेतून अनेक लोक, "परत या! परत या! मुंडे साहेब परत या!" अशा आर्त घोषणा देत असतात. ह्या घोषणा ऐकल्याबरोबर आपसूकच डोळ्यांच्या कडा पाणावतात! हुंदका दाटून येतो! खरंच, येतील का परत आमचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब? असा उगीच प्रश्न पडतो वेड्या मनाला! आणि मग हळूच दुसरं मन समजावतं, "अरे वेड्या, एकदा गेलेली माणसं परत येत असतात का?" आणि पुन्हा सुरु होतो तोच निराशेचा दुर्दैवी खेळ!

जगाच्या इतिहासात अगदी सामान्य परिस्थितीतून येवून असामान्य कर्तृत्व गाजवणारी, आपली वेगळी ओळख निर्माण करणारी बोटावर मोजण्याएवढी माणसं आहेत! कोणतेही आर्थिक अथवा राजकीय पाठबळ नाही. अशा खडतर  परिस्थितीत या माणसांनी  आपल्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर जगाच्या इतिहासात आपले नाव कोरले! त्यापैकीच नव्या पिढीतील गाजलेले नाव म्हणजे स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे! महाराष्ट्रातील उसतोड कामगारांचा मागास जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील नाथ्रा सारख्या ८० टक्के माळरानाच्या शिवारातून गोपीनाथ मुंडे नावाच्या झंजावाताचा उदय झाला.

स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकांत जन्मलेले गोपीनाथ मुंडे म्हणजे संघर्ष! नाथ्रा ते केंद्रीय मंत्रिपदांपर्यंतचा प्रवास एका लेखात लिहिण्यासारखा नक्कीच नाही! अंबाजोगाईच्या महाविद्यालयातून सुरु झालेला त्यांचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे! दुर्दैवाने वडील लवकर गेले परंतु पुढील शिक्षणाची जबाबदारी जेष्ठ बंधू श्री पंडितअण्णानी सक्षमपणे पार पाडली. दुसरीकडे विद्यार्थी संसदेच्या निवडणुका,

जनसंघ आणि शेवटी भाजपाच्या प्रचारकार्यात प्रवेश केला. शेठजी-भटजींचा पक्ष असलेल्या भाजपला मुठभर लोकांतून बाहेर काढून खेड्यापाड्यात-तांडा-वाडी-वस्ती-चारा छावणीपर्यंत पोहचवले. बाहेर प्रचार करतांना गोपीनाथराव मुंडेंचे लक्ष आपल्या परळीवर होतेच. त्यात १९७८ च्या बीडच्या जि.प. निवडणुकीत अंबाजोगाईच्या उजनी गटातून ते बीड जिल्हापरिषदेवर निवडून आले आणि पुन्हा मागे वळून पहिलेच नाही!

पुन्हा १९८० मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या. तिशीतील गोपीनाथराव परळी मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा! पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून भाजपच्या नावाखाली निवडून येण्याचा सन्मान श्री गोपीनाथराव मुंडेंना मिळाला! त्यानंतर एकावर एक संधी त्यांना मिळत राहिल्या आणि त्यांनी त्या सर्वच संधींचे सोने केले. पुढे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा एक ना अनेक संधी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळाल्या.

या पदांचा फायदा मुंडे साहेबांनी आपल्या पक्षाला मोठ्याप्रमाणात करून दिला. श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांमध्ये असलेला शेटजी-भटजींच्या भाजपची पाळेमुळे बहुजन समाजाच्या मनामनात खोलवर रुजविली! मुंडे साहेबांनी राजकारणात अनेक दैवी वरदान असल्यासारखे कार्य करून दाखवले. भाजपकडे अठरापगड जातींच्या लोकांना चुंबकासारखे खेचण्याचे काम मुंडेंनी केले. बहुजन समाजासाठी राजकारणात असलेला अवकाश मोठ्या शिताफीने मुंडे साहेबांनी भरून काढला.

साळी-माळी-धनगर-बंजारा-वंजारी-मुसलमान सारख्या वंचित जाती-धर्माच्या लोकांना देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात खेचून आणण्याचे महान कार्य गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केले! एवढेच काय उपेक्षित आणि दुर्लक्षित मराठा समाजाच्या नव्यानेतृत्वालासुद्धा भाजपमध्ये संधी देऊन सर्व जातींची एक मजबूत मोट बांधण्याचे कार्य गोपीनाथरावांनी केले.

gopinath munde
Chhatrapati Sambhaji Nagar : फुलंब्रीत पहिल्या महिला सभापतीपदी अनुराधा चव्हाण विराजमान

विविध पदांवर काम करतांना १९९२ ते १९९५ काळात गोपीनाथरावांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्षनेता म्हणून तमाम महाराष्ट्राला ओळख करून दिली. गोपीनाथराव उपेक्षितांचा चेहरा बनले. यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. रात्रंदिवस प्रवास, खेड्यापाड्यातील सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेऊन जनसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत केला. लाखोंच्या सभा जिंकण्याचे कसब, खडा आवाज, भारदस्त व्यक्तिमत्व, ग्रामीण आणि शहरी लोकांची नाडी पकडून-लोकांचा प्रतिसाद घेऊन बोलण्याच्या, संभाषण कलेच्या देणगीने गोपीनाथरावांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली.

gopinath munde
Hingoli : ‘पूर्णा’ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ;९ जुलैला मतदान

अल्पावधीत मुंडे महाराष्ट्रातील ओबीसी-वंचित-शोषितांचा चेहरा झाले. १९९४ च्या संघर्ष यात्रेतून  गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार, जळगावचे सेक्स स्कँडल यावर महाराष्ट्रभर रान उठवले. सरकारवर घणाघाती हल्ले चढवून  मुंडे नावाच्या वादळात भल्याभल्यांचे राजकीय मनसुबे धुळीला मिळवले!

            कळस म्हणजे मुंडे साहेब दोनवेळा बीड मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. सुदैवाने केंद्रात भाजपचे बहुमत आले आणि श्री नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात गोपीनाथरावांना केंद्रीय ग्रामविकासमंत्री हे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले! दुर्दैवाने हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही, ३ जून रोजी मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाले! महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली. राजकारण-जात-धर्मापलीकडे आपली ओळख निर्माण करणारा लोकनेता काळाने हिरावून नेला!

gopinath munde
Nashik Crime : हॉकर्स झोन आखणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

आज मुंडे साहेबांसारखा तडाखेबंद लोकनेता कुठेच दिसत नाही. फेसबुक, ट्विटर, इंस्टावर नुसती टीवटीव चालू आहे. सभा-भाषण ऐकायला लोक दुरून येत. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.अटलबिहारी वाजपेयी, स्व.प्रमोद महाजन, स्व.विलासराव देशमुख, स्व.गोपीनाथ मुंडे सारख्या तळागाळातून उगवलेल्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे!

सावधान गडयांनो! विद्यमान काळात राजकारण कूस बदलत असून नवनवीन राजकीय समीकरणात मतदार गोंधळून गेला आहे. तमाम महाराष्ट्राचे भले करणारे सर्वसमावेशक नेतृत्व आज दिसत नाही. आपापल्या अस्तित्वासाठी धडपड चालू आहे. लोकप्रश्नांची जाण असणाऱ्या, सामान्यांचे अश्रू पुसणाऱ्या लोकनेत्याची आज महाराष्ट्र वाट पाहतोय! संकुचित राजकारणात प्रचंड भ्रष्टाचार, कट्टरता आणि स्वार्थ बोकाळला आहे. राजकारणातील समाजकारण बाजूला गेले आहे. परंतु केवळ भावनेने पोट भरत नाही.

तेंव्हा, मुंडे साहेबांप्रती निष्ठा ठेवून युवा पिढीने काळाची पावले ओळखून आपले जीवन आचार-विचार-उच्चार संपन्न केले पाहिजे. शिक्षण-व्यावसायिकता याकडे लक्ष द्यायला हवे. व्यसन, मोबाईलचा अतिवापरावर नियंत्रण ठेवावे लागेल. जात-धर्म-पंथ बाबतीत कट्टरता नको. एखाद्या नेत्याचे कार्यकर्ते होऊन व्यसनी होण्यापेक्षा आपण आपल्या घरचे कर्तेधर्ते होऊया! मुरत से किरत भली,

बिन पंख उड जाए, मुरत तो जाती रही, किरत कभी न जाए! स्वतः आर्थिक स्वावलंबी, सक्षम, कर्तृत्ववान बनून घर, राज्य आणि देशाचे कीर्तिमान वाढवण्याची स्वतः शपथ घेऊन स्व.मुंडे साहेबांना आज स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करूयात! जय हिंद! जय भारत!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com