शासकीय वसतिगृह प्रवेश
अर्जासाठी अंतिम मुदत
-----
परभणी, ता. २० : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेच्या स्पॉट ॲडमिशनच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. स्पॉट ॲडमिशनसाठी नोंदणीची अंतिम मुदत मंगळवारी (ता. २०) रात्री १२ पर्यंत असून, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी २३ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीच्या पोर्टलच्या सर्व्हरची दुरुस्ती आणि अद्ययावतीकरण सुरू असल्याने हे पोर्टल तीन दिवस बंद होते. त्यामुळे समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या १९ ऑक्टोबरच्या सुधारित परिपत्रकानुसार स्पॉट ॲडमिशनचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
स्पॉट ॲडमिशनसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २३ ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. त्यानंतर प्राप्त अर्जांची ३० ऑक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत छाननी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत संबंधित शासकीय वसतिगृहात जमा करावी. पोर्टल सुरू झाल्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी संगणकाच्या कीबोर्डवरील कंट्रोल + एफ 5 ही कळ दाबून पेज रिफ्रेश करावे, जेणेकरून पोर्टलवरील अद्ययावत माहिती दिसेल. अद्याप नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.
वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमता अपुरी असल्यामुळे प्रवेश मिळाला नाही, तर आयुक्तालयाच्या निर्देशानुसार त्यांचे अर्ज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी वर्ग करण्यात येतील. मात्र, वसतिगृहात प्रवेश मिळाल्यानंतर स्वतःहून प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीही शासकीय वसतिगृहासाठी विहित मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.
स्पॉट ॲडमिशनसाठी यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज भरताना अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे.