
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या मोहिमेत ज्यांची घरे-दुकाने पाडली गेली त्या नागरिकांनी रविवारी (ता. २२) राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवत आपले गाऱ्हाणे मांडले. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिस यंत्रणेचे धाबे दणाणले. त्यांनी राज्यपालांचा ताफा बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. याचवेळी तेथे अतिक्रमण पाडलेल्या नागरिकांच्या भेटीसाठी आलेल्या माजी खासदार इम्तियाज जलील यांनी धाव घेत तेथील लोकांना समजावत बागडे यांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान, या प्रकारामुळे संतापलेल्या पोलिस आयुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला. पण, राज्यपाल बागडे यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल न करण्याची सूचना केली.