विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असे करा मतदान!

विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असे करा मतदान!
Published on: 
((इन्फोग्राफिक्स)) ----- पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाची अचूक पद्धत ------------ लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे, हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यातच जेव्हा विषय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा येतो, तेव्हा या प्रक्रियेला एक विशेष महत्त्व प्राप्त होते. समाजातील सुशिक्षित आणि विचारशील घटकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, येत्या शुक्रवारी (ता. २३) प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. मात्र, ही निवडणूक इतर सार्वत्रिक निवडणुकांसारखी (उदा. लोकसभा, विधानसभा किंवा ग्रामपंचायत) ईव्हीएम मशीनवर केवळ एक बटण दाबण्याइतकी सोपी नाही. या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर केला जातो आणि मतदानाची पद्धतही पूर्णपणे वेगळी असते. ----------- प्रक्रियेत मतदारांना उमेदवारांच्या नावासमोर आपला पसंतीक्रम नोंदवावा लागतो. थोडीशी चूक, अनावधानाने केलेली खूण किंवा चुकीच्या पेनचा वापर तुमचे बहुमूल्य मत थेट अवैध ठरवू शकतो. त्यामुळेच विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्व पदवीधर मतदारांना मतदानप्रक्रियेचे योग्य पालन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. तुमचे मत वाया जाऊ नये आणि लोकशाहीच्या या उत्सवात तुमचा योग्य व वैध सहभाग नोंदविला जावा, यासाठी मतदानाची ही संपूर्ण प्रक्रिया सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. खालील माहितीआधारे मतदानाची अचूक पद्धत समजून घ्या. ----- सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळी कशी? इतर निवडणुकांमध्ये आपण आपल्या आवडत्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण दाबून एकाच उमेदवाराला मत देतो. मात्र, पदवीधर निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना पसंती देण्याची संधी असते. ही संधी पसंतीक्रम या पद्धतीद्वारे दिली जाते. तुम्हाला जो उमेदवार सर्वात जास्त योग्य वाटतो, त्याला ‘पहिली पसंती’ आणि त्यानंतरच्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार दुसरी, तिसरी पसंती दिली जाते. ------ जांभळा स्केच पेन : मतदान करताना तुम्ही कोणता पेन वापरता, यावर तुमचे मत ग्राह्य धरायचे की नाही, हे अवलंबून असते. मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडून एक विशेष जांभळ्या (व्हायलेट) रंगाचा स्केच पेन दिला जातो. मतदारांनी फक्त आणि फक्त याच पेनचा वापर करून आपला पसंतीक्रम नोंदवायचा असतो. ------ मतदान करताना काय करावे? व्हायलेट पेनचाच वापर : मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच पसंतीक्रम नोंदवावा. पहिली पसंती अनिवार्य : मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या यादीत तुमच्या सर्वात आवडत्या (प्रथम पसंतीच्या) उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात ‘१’ हा आकडा स्पष्टपणे लिहावा. अंकांचा वापर : पसंतीक्रम देताना १, २, ३, ४ हे आकडेच वापरावेत. पुढील पसंती ऐच्छिक : इतर उमेदवारांना पसंती देणे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर (ऐच्छिक) अवलंबून आहे. इच्छा असल्यास अनुक्रमे ‘२’, ‘३’, ‘४’ असे आकडे लिहावेत. निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. ------- या चुका टाळाच! ‘१’ न लिहिणे : वैध मतदानासाठी किमान एका उमेदवारासमोर ‘१’ हा पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. तो न लिहिल्यास मत अवैध ठरते. एकापेक्षा अधिक वेळा ‘१’ लिहिणे : ‘१’ हा आकडा दोन किंवा अधिक उमेदवारांसमोर लिहिल्यास मत बाद होते. एकाच उमेदवारासमोर एकापेक्षा अधिक पसंतीक्रम लिहू नये. चुकीच्या खुणा करणे : पसंतीक्रम दर्शविण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर बरोबर (√) किंवा फुली (X) अशी खूण अजिबात करू नये. शब्दांत नोंदणी : पसंतीक्रम शब्दांत (उदा. एक, दोन, One, Two) लिहू नये. केवळ आकड्यातच नोंदवावा. ओळख उघड करणे : मतपत्रिकेवर स्वतःचे नाव, आद्याक्षरे (Initials), स्वाक्षरी (सही) किंवा अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतदाराची ओळख पटेल अशी कोणतीही खूण केल्यास मतपत्रिका बाद ठरते. इतर पेनचा वापर : निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या पेनव्यतिरिक्त स्वतःचा पेन, पेन्सिल किंवा इतर कोणत्याही रंगाचा पेन वापरल्यास मतपत्रिका अवैध ठरते. --------- पसंतीक्रम कसा नोंदवावा? समजा, मतपत्रिकेवर ४ उमेदवार आहेत: (अ), (ब), (क), आणि (ड). जर तुम्हाला वाटत असेल की ‘क’ उमेदवार निवडून यावा, तर ‘क’च्या नावासमोर १ लिहा. (हे करणे अनिवार्य आहे). तुमची दुसरी पसंती ‘अ’ असेल, तर ‘अ’च्या नावासमोर २ लिहा. तुमची तिसरी पसंती ‘ड’ असेल, तर ‘ड’च्या नावासमोर ३ लिहा. तुमची चौथी पसंती ''ब'' असेल, तर ''ब'' च्या नावासमोर ४ लिहा. (टीप : प्रत्येक उमेदवारासमोर वेगळा पसंतीक्रम असल्याची खात्री करा.) ---------- निवडणूक अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदार हे उच्चशिक्षित आणि समाजाचे जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया बारकाईने समजून घेणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे की, मतदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. आपली एक छोटीशी चूक आपले मत अवैध ठरवू शकते. त्यामुळे मतदान करताना घाई न करता, दिलेल्या सूचनांचे पालन करून आपला मतदानाचा हक्क बजवावा. येत्या शुक्रवारी जास्तीत-जास्त पदवीधरांनी घराबाहेर पडून या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com