जिल्ह्यात पदवीधरसाठी ७६ मतदान केंद्रे
-----
जिल्ह्यात एकूण २९ हजार १४५ मतदार बजावणार हक्क
---
धाराशिव, ता. २२ (बातमीदार) ः औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २९ हजार १४५ पदवीधर मतदार असून, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ६५ ठिकाणी एकूण ७६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी उमरगा तालुक्यात सर्वाधिक सहा हजार ५८ पदवीधर मतदार आहेत, तर धाराशिव तालुक्यात सर्वाधिक १६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. धाराशिव तालुक्यात पाच हजार ७६५ मतदारांसाठी १२ ठिकाणी १६ मतदान केंद्रांची, तुळजापूर तालुक्यात चार हजार ७१३ मतदारांसाठी ११ ठिकाणी ११ मतदान केंद्रे, उमरगा तालुक्यात सहा हजार ५८ मतदारांसाठी १० ठिकाणी १२ मतदान केंद्रे, लोहारा तालुक्यात तीन हजार ३१५ मतदारांसाठी चार ठिकाणी सहा मतदान केंद्रे, कळंब तालुक्यात चार हजार ६० मतदारांसाठी नऊ ठिकाणी १० मतदान केंद्रे, भूम तालुक्यात एक हजार ७५० मतदारांसाठी आठ ठिकाणी आठ मतदान केंद्रे, वाशी तालुक्यात एक हजार ७४७ मतदारांसाठी चार ठिकाणी पाच मतदान केंद्रे, तर परंडा तालुक्यात एक हजार ७३७ मतदारांसाठी सात ठिकाणी आठ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २९ हजार १४५ पदवीधर मतदारांसाठी ७६ मुख्य मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, एकही सहायक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेले नाही. सर्व ७६ मतदान केंद्रे तळमजल्यावर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार तसेच अन्य मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोचणे अधिक सुलभ होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींना आवश्यकतेनुसार तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. मतदान केंद्रावर प्रथमोपचार साहित्य, ओआरएस पाकिटांची व्यवस्था आणि तातडीच्या उपचारांसाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.