गुंठेवारी नियमितचे शुल्क हप्त्याने शक्य - एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ शिंदे

गुंठेवारी नियमितचे शुल्क हप्त्याने शक्य - एकनाथ शिंदे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांची घरे नियमित होणार आहेत. त्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्काचे हप्ते पाडून देण्याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना केली जाईल, असे आश्‍वासन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवनेरी कॉलनीतील विजय चौक ते रुचके मंगल केंद्र, सिंधी कॉलनी, संत एकनाथ रंगमंदिर ते शाह कॉलनी आणि मिटमिट्यात भारत टॉवरपासून कोमलनगरपर्यंत या चार रस्त्यांच्या व्हॉइट टॉपिंग कामांचे मंगळवारी (ता. २३) नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी उद्‍घाटन केले, याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, युवा सेनाचे अमित चव्हाण, माजी सभापती राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: सिंधू ‘बीडब्ल्यूएफ’ ॲथलीट आयोगाची निवडणूक लढवणार

नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले, की शहरासाठी राज्य सरकारने भरघोस निधी दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा उपयोग देखील या शहराला होणार आहे. शिवाय शहरात १५० कोटींचे रस्ते बनविण्यात आले. १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ५ हजार किलोमीटरचा अ‍ॅक्सेस रोड तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. रस्ते विकासाबरोबरच समृद्धी महामार्ग, वाळूज, शेंद्रा- बिडकीन व डीएमआयसीच्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून औरंगाबादची औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी केली जात असून नियमितीकरणासाठी आकारण्यात आलेल्या पैशाचे हप्ते पाडून देण्याबद्दल महापालिका प्रशासनाला सांगितले जाईल असे सांगून लोकांना गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

रावसाहेब आमले यांचे झाले स्मरण

मिटमिटा येथे एक कोटीतून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाची सुरवात झाली. यावेळी बोलताना श्री. शिंदे यांनी दिवंगत नगरसेवक रावसाहेब आमले यांची आठवण केली. ते म्हणाले, की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामे करणारी शिवसेना नाही तर, चांगले जनहिताची आणि दर्जेदार कामे करणे हीच शिवसेनेची ओळख आहे. नागरिकांच्या सुख दु:खात धावून जाणारा खंदा शिवसैनिक, माजी नगरसेवक रावसाहेब आमले यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाल्याचे सांगताना श्री. शिंदे आणि उपस्थित गहिवरले.

loading image
go to top