esakal | Rain Update: तुफानी पावसात औरंगाबाद शहरावर ढगफुटी!
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

तीन तासांत तब्बल ११६ मिलिमीटर पाऊस, अग्निशमन विभागाकडे तासभरात आले ५० कॉल, शहर परिसरातील सर्वच नाल्यांना आला पूर.

Rain Update: तुफानी पावसात औरंगाबाद शहरावर ढगफुटी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याच्या माऱ्याने मंगळवारी रात्री शहराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने रस्ते जलमय झाले अन् अनेकांच्या घरात पाणी घुसले. पावसाच्या रौद्र रूपात अर्ध्या शहराची वीज गुल झाल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले होते. तसेच परिसरातील सर्वच नाले तुडुंब भरून वाहिले. शहर परिसरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपर्यंत फक्त ५.७ मिमी पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर साडेपाच ते रात्री साडेआठपर्यंत तब्बल ११६ मिमी पाऊस झाला. विशेष म्हणजे, हा पाऊस तासाभराच्या कालावधीत झाला. तर रात्री साडेआठपर्यंत दिवसभरातील एकूण १२१.७ मिलिमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली. एमजीएम वेधशाळेत रात्री ०७:१० ते ८:१० या एका तासात ८७.६ मिमी पावसाची नोंद झाली. ढगफुटी झाल्याने पाणी काढण्यासाठी अग्निशमन विभागाकडे तासाभरात ५० कॉल आले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांना रात्र घराबाहेर काढावी लागली. दरम्यान, या वर्षातील हा ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस झाला.

शहरात सलग चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मंगळवारी सकाळीही रिपरिप सुरू होती. मात्र, रात्री सातच्या सुमारास पावसाने रौद्र रूप दाखविले. तासाभरात जवळपास शंभर मिलिमीटरच्या वर जवळपास पाऊस झाल्याने शहरातील सर्वच नाल्यांना पूर आला तर रस्त्यांवर सुद्धा पुरासारखी परिस्थिती होती. शहरातील किराडपुरा येथील नाला, रहेमानिया कॉलनी, पंचकुआ कब्रस्तान, औषधी भवन, सातारा-देवळाई येथील नाल्याला पूर आला होता. कॅनॉट परिसरात येथे एक झाड पडल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. शिवाय येथील रस्त्यावरसुद्धा पाणीच पाणी होते.

या वर्षातील हा ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस झाला

या वर्षातील हा ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस झाला

शहरातील नारेगाव, मसनतपूर, चिकलठाणा, हिनानगर, जाधववाडी, मिसारवाडी, आंबेडकरनगर, हर्सूल, जटवाडा, स्वामी विवेकानंद नगर, उद्धव पाटील नगर, आरेफ कॉलनी, भीमनगर, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, छावणी, पडेगाव, मिटमिटा, विटखेडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, सातारा, देवळाई, सादातनगर, नागसेननगर, गारखेडा, जयभवानीनगर, जुना मोढा, संजयनगर, भवानीनगर, सिडको-हडको, पुष्पनगरी, मुकुंदवाडी, रामनगर यासह जुन्या शहरातील उल्कानगरी, श्रेयनगर, जवाहरनगर, सहकारनगर, उत्तमनगर, समर्थनगर, क्रांती चौक, सिल्लेखाना, जुना बाजार, किराडपुरा, नेहरूनगर, बुढीलेन, सिटीचौक, वैलासनगर, कटकटगेट, रोषणगेट, गणेश कॉलनी, बायजीपुरा या भागात रस्त्यावर पाणीच पाणी होते. अनेक घरात पाणी साचले.

औषधी भवन येथील नाल्याला पूर-
औषधी भवन येथील जास्त पाऊस झाल्यास नेहमी हाहाकार असते. येथील नाल्यात पाच ते सहा दुचाकी वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. आझाद चौक ते माता मंदिर चौकादरम्यान पाणीच पाणी झाले होते. येथे अनेक घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीच्या सीटपर्यंत पाणी आल्याने त्या बंद पडल्या होत्या. तसेच ॲपेक्स हॉस्पिटल येथील नाल्यावर पाणी वाहत आहे.

 या पावसाने रस्ते जलमय झाले अन् अनेकांच्या घरात पाणी घुसले

या पावसाने रस्ते जलमय झाले अन् अनेकांच्या घरात पाणी घुसले

नूर कॉलनीत घरात पाणी, रात्र काढली उघड्यावर-
नूर कॉलनीचा परिसर नाल्याच्या बाजूला आहे. मागील वर्षी सुद्धा येथील घरात पाणी गेले होते. आता जोरदार पाऊस झाल्याने येथील घरात पाणीच पाणी झाले आहे. गुडघ्यापर्यंत पाणी असल्याने ते बाहेर काढणे येथील रहिवाशांना शक्य झाले नाही. घरात पाणीच पाणी असल्याने त्यांना रात्र उघड्यावर जागरण करून काढावी लागली. तर सईदा कॉलनी जटवाडा, हर्सूल येथील घरांमध्ये पाणी शिरले होते.

पैठणगेट येथील दुकानात पाणीच पाणी-
पैठणगेट ते गुलमंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक दुकाने अंडरग्राऊंड आहेत. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पुरासारखी परिस्थिती होती. हे पाणी या अंडरग्राऊंड दुकानांमध्ये शिरले. काही दुकानात तर कमरेएवढे पाणी साचले होते. त्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.

बीड बायपास रस्ता जॅम, सातारा देवळाईकरांचे हाल-
देवळाई चौक, आयप्पा मंदिर चौक, रेणुकामाता कमान, छत्रपती नगर कमान इत्यादी ठिकाणी देवळाई-सातारा परिसरातील लोकांना घराकडे जाण्यास पुरामुळे रस्ताच मिळाला नाही. जवळपास दोन-अडीच तास ट्रॅफिक रोडवर थांबलेली होती. अशा प्रसंगी घरी जाणाऱ्या चाकर मंडळींचे खूप हाल झाले. अनेक ठिकाणी मूळ ओढ्याचे, नाल्याचे स्रोत अडवल्या गेल्या मुळे नैसर्गिक रित्या वाहून जाणारे पाणी अडवले गेले. त्यामुळे पूरसदृश स्थिती सातारा- देवळाई परिसरात निर्माण झाली. बीडपायपास रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे तसेच या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने जोरदार पावसामुळे येथे रोड जॅम झाला होता. अनेक वाहने जोरदार पावसामुळे रस्त्याच्या कडेला उभी होती. एमआयटी महाविद्यालयासमोर नाल्याला पूर आला होता. मुख्य बीड बायपास रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. सातारा परिसरात गट नं ८२ जवळील असलेला पूल पाण्याखाली गेला. भारत बटालियन, खंडोबा मंदिर परिसर, सातारा गावात जाणाऱ्या रस्त्यावरच्या पुलावर मोठा पूर होता.

सिडको-हडकोमध्ये रस्ते वाहिले-
सिडको-हडको परिसरात एन-७ येथील वसुंधरा कॉलनीत अडीच फूट पाणी साचले होते. तर बजरंग चौक येथे रस्त्यावर पुरासारखे पाणी होते. टीव्ही सेंटर भागात सुद्धा अनेक रस्त्यावर पाणीच पाणी होते.

वाहने चालविणे झाले होते अवघड-
वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तासभर अनेकांना वाहने चालविणे सुद्धा अवघड झाले होते. तुफान पाऊस होत असल्याने अनेकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली होती. रस्त्यावर पुरासारखी स्थिती असल्याने अनेकांच्या दुचाकीच्या सीटपर्यंत पाणी आले होते. तर काही ठिकाणी चारचाकी तरंगतील एवढे पाणी साचले होते. पाऊस थांबल्यानंतर सुद्धा पाण्यामुळे वाहन चालविणे अवघड गेले.

ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस- श्रीनिवास औंधकर

ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस- श्रीनिवास औंधकर

ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस- श्रीनिवास औंधकर
मंगळवारी शहरावर सायंकाळी सात वाजून दहा मिनिटाला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुढील दोन तीन मिनिटात, म्हणजे सात वाजून १२ मिनिटाच्या दरम्यान अतिशय रौद्र रूप धारण केले. यानंतर ०८:१० पर्यंत म्हणजे एका तासाच्या कालावधीत ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनिटाच्या काळात (०७:४० पर्यंत) पाऊस पडण्याचा सरासरी वेग हा १६६.७५ मिमी एवढा नोंदला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत ५६.२ मि.मी पावसाची नोंद एमजीएम वेधशाळेत झाली. म्हणजेच औरंगाबाद शहराला ढगफुटीपेक्षा वेगाने झोडपून काढले (ताशी शंभर मि. मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हटली जाते) रात्री ०७:४० नंतर पावसाचा वेग थोडा कमी होत गेला. ०७:५० पर्यंत सरासरी ८६.९ मी. मी. वेग होता व नंतर ०८:१० पर्यंत तो कमी होत ५३.२४ मिमी प्रति तास पावसाचा वेग राहिला. तर सायंकाळी ०७:१० ते ०८:१० या एका तासात ८७.६ मि. मी.ची शहरात पावसाची नोंद झाली, अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

असा झाला पाऊस (चिकलठाणा वेधशाळेत झालेली नोंद)-
सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत- ५.७ मिमी
साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत : ११६ मिमी
रात्री साडेआठपर्यंत दिवसभरात एकूण : १२१ मिमी

loading image
go to top