भेंडाळा, कायगाव परिसरात जोरदार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain in Bhendala

भेंडाळा, कायगाव परिसरात जोरदार पाऊस

कायगाव (ता. गंगापूर) - भेंडाळा, कायगाव परिसरात बुधवारी (ता. २२) रोजी रात्री आठ ते बारा वाजेदरम्यान झालेल्या दमदार पावसाने सर्वदूर शेतशिवार ओलेचिंब झाले असून शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, पेरणी, लागवडी योग्य पाऊस झाल्याने आणि गत वर्षी कपाशीला चांगला भाव मिळाल्याने यंदा कपाशीचा पेरा वाढणार आहे.

परिसरातील जामगाव, ममदापूर, नवाबपूरवाडी, अगरकानडगाव, बगडी, कायगाव, अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, गळनिंब, अगरवाडगाव, धनगरपट्टी, भिवधानोरा, भेंडाळा, पिंपळवाडी, बाबरगाव, खैरगव्हान, बोलेगाव, सैय्यदपूर, ढोरेगाव, पेंडापूर, सोलेगाव, पुरी आदी गाव शिवारात पावसाने चांगलीच हजेरी लावली.

रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्र काही भागात बरसले. पण काही भागात रुसल्याने त्या ठिकाणची मान्सूनपूर्वी शेती कामे आणि खरीप पेरणी रखडली होती. पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. मात्र, कायगाव व परिसरात मंगळवारपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी दुपार पर्यंत ऊन, सावलीचा खेळ सुरू होता. दुपारनंतर ढगांनी गर्दी केली. सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आणि रात्री आठ ते बारा वाजे पर्यंत जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणीच पाणी केले. गोदावरी नदी काठच्या बागायती भागातील ऊस, कापूस पिकास पाऊस उपयुक्त ठरला आहे.

भेंडाळा मंडळात सर्वांत जास्त पाऊस

बुधवारी रात्री गंगापूर तालुक्यात झालेला पाऊस हा सर्वात जास्त भेंडाळा महसूल मंडळात झाला. या भागात जोरदार पाऊस झाल्याने येथे सर्वाधिक ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप पेरणीसह शेती कामांना वेग येणार असून धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Heavy Rain In Bhendala Kayagaon Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top