हेल्मेटविना बिघडली वाहतूक शिस्त
‘नो कारवाई’मुळे चालक निर्धास्त, प्रशासनाची ढिम्म भूमिका
.........
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ ः रस्त्यावरून धावणारी दुचाकी वाहने आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून होणारी सुसाट वाहतूक... हे चित्र सध्या धाराशिव शहरात गल्लीबोळांपासून मुख्य चौकांपर्यंत रोजचेच झाले आहे. शहरात हेल्मेट न वापरणाऱ्यांवर ना कोणती दंडात्मक कारवाई सुरू आहे, ना दुचाकीचालकांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी आहे. विनाहेल्मेट सर्रास दुचाकी चालविल्या जात असून, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शहरातील वाहतुकीची शिस्त पूर्णपणे बिघडली आहे.
धाराशिव शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असताना ‘ऑल इज वेल’चा आव आणला जात आहे. स्थानिक वाहतूक शाखा आणि पोलिस प्रशासनाच्या या शांत भूमिकेमुळे दुचाकीचालक कमालीचे निर्धास्त झाले असून, अपघातातील गंभीर दुखापतींचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
प्रमुख चौकांत सुरक्षेचा बोजवारा
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, बार्शी नाका, तुळजापूर रोड आणि प्रशासकीय इमारतींच्या परिसरामध्ये दररोज हजारो दुचाकीस्वार प्रवास करतात. मात्र, यातील बोटावर मोजण्याइतके चालक वगळता उर्वरित सर्वजण विनाहेल्मेट प्रवास करताना दिसतात.
........
((पाँईटर))
...अशी आहे स्थिती
- धाक उरला नाही : शहरात कुठेही हेल्मेट तपासणी किंवा दंडात्मक कारवाई होत नसल्यामुळे वाहनधारकांना कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही.
- तरुणांमध्ये बेफिकीर वृत्ती : ट्रिपल सीट प्रवाशांची वाहतूक, वेगाची मर्यादा ओलांडणे आणि त्यातच डोक्यावर हेल्मेट नसणे यामुळे अपघातांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
- कारवाई केवळ कागदावर : वेळोवेळी होणाऱ्या रस्ते सुरक्षा सप्ताहापुरतीच जनजागृती सीमित राहिल्याचे चित्र असून प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य आहे.
.......
((पाँईटर))
- हेल्मेटचे महत्त्व आणि विनाहेल्मेटचे धोके
- दुचाकी अपघातामध्ये होणारे बहुतांश मृत्यू हे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे होतात. म्हणूनच हेल्मेट हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून स्वतःचा जीव वाचवण्यासाठीचे सुरक्षा कवच आहे.
- अपघाताच्या वेळी डोक्याला थेट जमिनीचा किंवा दुसऱ्या वाहनाचा मार बसण्यापासून हेल्मेट बचाव करते. यात असणारे ''इम्पॅक्ट ॲब्जॉर्बिंग'' मटेरियल धक्का शोषून घेते.
- दर्जेदार हेल्मेटचा वापर केल्यास अपघातात डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतींचा धोका तब्बल ७० टक्क्यांनी आणि मृत्यूचा धोका ४० ते ५० टक्क्यांनी कमी होतो.
- गाडी चालवताना डोळ्यांत धुळीचे कण, किडे, तीव्र वारा आणि थेट सूर्यप्रकाश यापासून हेल्मेटचा व्हायझर चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे रक्षण करतो.
- अपघातानंतर न्यूरो-सर्जन, आयसीयू आणि शस्त्रक्रियेचा खर्च लाखांच्या घरात जातो. एका निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात सापडते.
- मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट न वापरल्यास १ हजार रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची कायदेशीर तरतूद आहे.
........
नागरिकांची आणि प्रशासनाची जबाबदारी
रस्त्यांची स्थिती, खड्डे आणि वाढती वाहनांची संख्या पाहता धाराशिव वाहतूक शाखेने तातडीने मोहिमा राबवून विनाहेल्मेट चालकांवर कडक दंडात्मक कारवाई सुरू करण्याची गरज आहे. त्याचसोबत ‘दंड भरण्यापेक्षा हेल्मेट खरेदी करा’ ही भावना धाराशिवकरांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.
....................
((कोट))
रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत येणाऱ्यांमध्ये दुचाकी अपघातांतील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात डोक्याला मार लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. विनाहेल्मेटमुळे हा धोका वाढलेला आहे. हेल्मेट वापरल्यास मृत्यूचा धोका कमी होतो. तसेच उष्माघातापासून, धुळीपासून डोळ्यांचे संरक्षण होते. शहराअंतर्गत जायचे असेल तरीही हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.
- डाॅ. इस्माईल मुल्ला, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव
....................
((कोट))
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकार असून त्याठिकाणी रोज हेल्मेट न वापरणाऱ्या ३५ ते ४० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. धाराशिव शहरात मात्र अजून हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू केलेली नाही.
- अरविंद हिंगोले, वाहतूक पोलिस अधिकारी, वाहतूक विभाग, धाराशिव
.......
धाराशिव ः शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर विनाहेल्मेट दुचाकी चालविताना चालक.
फोटो क्रमांक ः OSM26B06897