‘हिंदी देशातील बहुभाषिक जनतेला जोडणारा दुवा’
धाराशिव, ता. २० : ‘हिंदी ही केवळ साहित्याची भाषा नसून देशातील बहुभाषिक व बहुसांस्कृतिक जनसामान्यांना परस्परांशी जोडणारा संवादाचा मुख्य दुवा आहे. विद्यार्थ्यांनी भाषिक वैविध्याचा आदर करत हिंदीच्या समृद्धीसाठी सकारात्मक योगदान द्यावे’, असे आवाहन हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. आडे यांनी केले.
श्री तुळजाभवानी महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त विविध भाषिक व साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याला, सृजनशीलतेला आणि विचारशक्तीला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने वक्तृत्व, निबंधलेखन, वादविवाद आणि व्यंगात्मक साहित्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. प्राचार्य प्रा. डॉ. जीवन पवार यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. भित्तिपत्रिकेत हिंदी भाषेचा इतिहास, साहित्याची समृद्ध परंपरा आणि आधुनिक युगातील हिंदीची भूमिका प्रभावीपणे मांडण्यात आली. स्पर्धांचे उद्घाटन मराठी विभागप्रमुख डॉ. बापूराव पवार यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थिनींनी साकारली भित्तिपत्रिका
बी.ए. व बी.कॉम. तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी गायत्री गुरव, विद्या पवार, मुस्कान शेख आणि प्रियांका कुंभार यांनी आकर्षक भित्तिपत्रिका साकारली. यात मुंशी प्रेमचंद, गोस्वामी तुलसीदास, संत मीराबाई, भारतेंदू हरिश्चंद्र आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ यांसारख्या साहित्यिकांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. शिकवण्या निपाणीकर, आभार डॉ. उषा ठोंबरे यांनी मानले. यावेळी डॉ. नेताजी काळे, प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. स्वाती बैनवाड, प्रा. डॉ. फरजाना तांबोळी, प्रा. सुदर्शन गुरव उपस्थित होते.