दिवाळीमुळे हिंगोलीचा
मोंढा आठवडाभर बंद
-------------------
हिंगोली, ता. ३१ : दीपावली सणानिमित्त बाजार समितीचे हळद मार्केट यार्ड आणि भुसार मोंढा आठवडाभर बंद राहणार आहे. या दिवसात शेतमालाची खरेदी- विक्री होणार नसल्याची माहिती सचिव संपतराव मुंढे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी दीपावली सणानिमित्त हळद मार्केट यार्ड आणि भुसार मोंढा बंद ठेवण्यात येतो. शेतकरी, आडत व्यापारी, खरेदीदार, मापारी, हमाल बांधवांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी, याकरीता ही सुटी देण्यात येते. यंदा ४ ते ११ नोव्हेंबर दरम्यान हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येतील. तर, ५ ते ११ नोव्हेंबरदरम्यान भुसार मोंढ्यातील व्यवहार बंद राहतील. तर, १२ नोव्हेंबरपासून हळद मार्केट यार्ड आणि भुसार मोंढ्यातील व्यवहार पूर्ववत होणार आहेत.
सध्या हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक सरासरी दीड हजार क्विंटल होत आहे. या हळदीला १८ ते २३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तर, सोयाबीनची जवळपास एक हजार ते एक हजार २०० क्विंटलची आवक होत आहे. सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांदरम्यान सोयाबीनला भाव मिळत आहे.