((फोटो येणार आहे))
---
हिंगोलीत आज रावण दहनाचा थरार!
-----
रात्री ११.५७ चा मुहूर्त; रामलीला मैदानावर हजारो नागरिक राहणार उपस्थित
-----
हिंगोली, ता. १९ : भारतात म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेल्या रावण दहनाची तयारी महोत्सव समितीच्या वतीने पूर्ण झाली असून, मंगळवारी (ता. २०) रात्री ११.५७ च्या मुहूरतावर रामलीला मैदानावर ५१ फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.
शहरातील रामलीला मैदानावर ११ ऑक्टोबरपासून ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे १७२ वे वर्ष असून, या महोत्सवात भरविण्यात आलेल्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनात विविध प्रकारचे मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहे. महोत्सवात रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. महोत्सव समितीच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धाही घेण्यात येत आहेत. दसरा महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून, रात्री ११.५७ ला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, दसरा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.
-----
पुतळ्यासाठी अडीचशे मीटर कपडा, बांबूंचा वापर
दसरा महोत्सवात ५१ फुटी रावणाचा पुतळा तयार करण्यासाठी जवळपास २०० ते २५० मीटर कपडा, ट्रॅक्टरभर गवत, जवळपास १५० ते २०० बांबू, कागद, फटाके यांसह इतर साहित्याचा वापर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील बमरुले कुटुंबीयांच्या वतीने रावणासह बिभीषण, हनुमान, गरूड, जटायू आदी पुतळे तयार करण्यात आले आहेत.
---
आयोध्यातील कलावंत सादर करणार युद्धप्रसंग
घटस्थापनेपासून येथील रामलीला मंचावर रामलीलेचे आयोजन करण्यात आले असून, आयोध्या येथील कलावंतांच्या वतीने रामायणातील विविध प्रसंग सादर करण्यात येत आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम-रावणातील युद्ध व रावणवधाचा प्रसंग सादर करण्यात येणार आहे.